वलवण व नांगरगाव विभागातील सर्व सफाई कर्मचारी व मुकादम यांना दिवाळी पाडव्यानिमित्त नगरसेवक सुभाष डेनकर यांच्या वतीने अल्पोपहार व भेट वस्तू वाटप
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वलवण व नांगरगाव विभागातील सर्व सफाई कर्मचारी व मुकादम यांना दिवाळी पाडव्यानिमित्त या प्रभागातील नगरसेवक सुभाष सुमंत डेनकर यांच्यावतीने अल्पोपहार व भेट वस्तू देण्यात आल्या.
सफाई कर्मचारी हे खऱ्या अर्थाने स्वच्छता दूत आहेत. ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता दररोज सकाळी प्रभागांमधील रस्ते व अंतर्गत भाग स्वच्छता करण्याचे काम हे सफाई कर्मचारी करत असतात. प्रभागातील मुकादम हे देखील या कर्मचार्यांकडून योग्य प्रकारे सर्व भागाची स्वच्छता करून घेत असतात. अशा या स्वच्छता दूतांचा खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाच्या निमित्त सन्मान करत त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या.
वलवण व नांगरगाव विभागातील सर्वच स्वच्छता कर्मचारी व मुकादम हे नेटने प्रभागांमध्ये स्वच्छता ठेवण्याचे काम करत आहे. अशा या कर्मचाऱ्यांची दिवाळी लोकप्रतिनिधींकडून गोड करण्यात आली. सध्या सर्वत्र दिवाळी उत्साहात सुरू आहे नागरिक रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवतात व परिसरामध्ये सर्वत्र कचरा होत असतो. हा सर्व कचरा नागरिक उठण्यापूर्वी पहाटेपासूनचे स्वच्छता कर्मचारी गोळा करत संपूर्ण परिसर हा पुन्हा स्वच्छ करत असतात. वर्षभर त्यांचीही दिनचर्या सुरू असते अशा या स्वच्छता दूतांचा हा छोटेखानी सन्मान असल्याची भावना नगरसेवक सुभाष डेनकर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे बंधू संदीप डेनकर, शितल डेनकर, प्रिया डेनकर हे देखील उपस्थित होते.
















