Breaking news

लोणावळ्यात पर्यटकांसाठी पर्वणी! वाकसई येथे 'कृष्णाज् फन वर्ल्ड'चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

लोणावळा : जागतिक स्तरावर पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यातील पहिल्या व सर्वात मोठ्या गेम्स झोनचे म्हणजेच 'कृष्णाज् फन वर्ल्ड'चे उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिमाखात पार पडले. लोणावळा शहरालगतच्या वाकसई येथे, हॉटेल जगद्गुरु शेजारी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक गेम्स झोनचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते झाले.

दहा हजार चौरस फुटांच्या प्रशस्त व वातानुकूलित हॉलमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यामध्ये बॉलिंग ॲले या प्रमुख व सर्वाधिक आकर्षणाच्या खेळासह ३५ हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सचा आनंद नागरिकांना एकाच छताखाली घेता येणार आहे. लहान मुलांपासून ते तरुण आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच विविध खेळ येथे उपलब्ध असून, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे दोन्ही महानगरांतील पर्यटकांसाठी हे हक्काचे ठिकाण ठरणार आहे.

उद्घाटनाप्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी स्वतः काही गेम्स खेळण्याचा आनंद घेतला. "स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी हा गेम्स झोन एक प्रमुख आकर्षण केंद्रबिंदू ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पावले निश्चितच या नव्या केंद्राकडे वळतील, असेही ते म्हणाले.

लोणावळ्यातील उद्योजक राजेंद्र चौहान, वाकसई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व उद्योजक बाळासाहेब भरत येवले आणि शिवव्याख्याते प्रमोद बोराडे या तिघांनी एकत्र येत हा नाविन्यपूर्ण उपक्रम उभारला आहे. येथे खेळांसोबतच वाढदिवस आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष सवलतही दिली जाणार असून पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पावसाळी पर्यटनाव्यतिरिक्त हिवाळा व उन्हाळ्यात लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसमोर मनोरंजनाचा प्रश्न असतो, याला 'कृष्णाज् फन वर्ल्ड'मुळे एक उत्तम पर्याय मिळाला आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्यास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती दिपाली दीपक हुलावळे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, नगरसेविका नयना पैलकर, नगरसेवक अनिल गवळी, नगरसेवक जाकिर खलिफा, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, वाकसई गावच्या सरपंच सोनाली मनोज जगताप, सरपंच संजय खांडेभरड, उपसरपंच श्याम विकारी, सुरेश केदारी, पंचायत समिती सदस्य रेशमा राजू देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय उर्फ भाऊसाहेब गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन घोटकुले, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखळकर, शिवसेना गडचिरोली प्रमुख महेश केदारी, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष किरण हुलावळे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान अध्यक्ष भरत भाऊ येवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या