Breaking news

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

लोणावळा : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… चा जयघोष करत आज पाच दिवसांच्या बाप्पांचे सर्वत्र उत्साहात विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या या गणेश विसर्जनाला ढोल ताशे व मिरवणूका नसल्या तरी भाविकांचा उत्साह कायम होता. 

    कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील संपूर्ण गौरी गणपतीच्या सणावर दिसून आला आहे. विसर्जन मिरवणुकीत नेहमी दिसणारे ढोल लेझीम पथके तसेच बैंड च्या साथीने गुलालाची उधळण करीत मार्गक्रमण करणारे गणेशभक्त, तसेच गौरीच्या पुढे फेर धरून नाचणाऱ्या महिला असं दृष्य यावर्षी कुठेही दिसले नाही. विसर्जन घाटावर तैनात असलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यांनी त्याठिकाणी घातलेले निर्बंध यामुळेही गणेशभक्त खट्टू झाले होते.  

    यंदा पाच दिवस मुक्कामी आलेल्या घरगुती तसेच काही सार्वजनिक मंडळाचे गणपतीचे विसर्जन शहरातील लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात तसेच लोणावळा डॅम, वलवण तलाव, खंडाळा तलाव, इंद्रायणी नदी, तुंगार्ली गावातील तुंगारेश्वर मंदिर विहीर या ठिकाणी करण्यात आले. विसर्जना दरम्यान कोठेही काही दुर्घटना घडू नये यासाठी लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तसेच जीवरक्षक पथके तैनात करण्यात आली होती.

इतर बातम्या