Expressway Traffic : शनिवार रविवारच्या सलग सुट्टयांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूककोंडी

लोणावळा : शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा खंडाळा व ग्रामीण परिसरामध्ये वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आल्यामुळे आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई पुणे मार्गावरील ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खंडाळा बोगद्याजवळ काही काळ थांबवून धरत लोणावळ्याच्या दिशेने येणार्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या केल्या जात होत्या. तरी देखील वाहनांच्या पुणे मार्गिकेवर लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. लोणावळा व खंडाळा शहरात देखील मोठी वाहतूककोंडी झाली होती.
लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर व ग्रामीण भागात मोठा पोलीस बंदोबस्त तसेच स्वंयसेवक नियुक्त करत ही कोंडी सोडविण्याचे नियोजन करण्यात आले होते. शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच भुशी धरण व लायन्स पाॅईटकडे जाणार्या मार्गावर वाहने थांबविण्यास मज्जाव करण्यात आल्याने या भागात कोंडी कमी झाली होती. भुशी धरण व लायन्स पाॅईटचा परिसर तसेच भाजे लेणीचा परिसर पर्यटकांनी गजबजला होता. खंडाळा येथील राजमाची गार्डन शेजारी निसर्गाचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवार व रविवारच्या सुट्टयानंतर सोमवारी एक दिवस वगळता पुन्हा मंगळवार व बुधवारी सुट्टया असल्याने या सलग सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.