Breaking news

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अल्टा लॅबोरेटरीज कंपनीकडून स्कुबा ड्रायव्हिंगचा सेट भेट

खोपोली (प्रतिनिधी) : आपत्तीच्या वेळी मदतीसाठी अग्रेसर असणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला वॉटर रेस्क्यू ऑपरेशनसाठी स्कुबा डायव्हिंग सेटची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन खोपोलीतील प्रसिद्ध अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीने तो सेट उपलब्ध करून देत समाजासाठी मदत करणाऱ्यांना मदत केली. 

     महाराष्ट्रातील विविध भागात पाण्यात बुडून होणाऱ्या अपघातात तातडीने मदतीसाठी जाणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांना खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते अल्टा लॅबोरेटरीज कंपनीचे उच्चाधिकारी बाळाराम म्हात्रे, अंकुश धायगुडे, बबन आवारे, विजयकुमार चुरी आणि संतोष प्रधान यांच्या उपस्थितीत स्कुबा डायव्हिंग सेट देऊन त्यांचे हात बळकट केले. यावेळी संस्थेच्या वतीने गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, अक्षय चांदूरकर, पूजा चांदूरकर, भक्ती साठेलकर हे सदस्य तसेच या उपक्रमात अग्रेसर असलेले महेश राठी आणि शिल्पा मोदी हे मान्यवर देखील उपस्थित होते. 

     औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड नेहमीच करत असते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी अल्टा कंपनीत घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत केलेल्या मदतीची कंपनीने दखल घेतली आणि त्यातून उतराई होण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी ओळखून छोटीशी भेट दिल्याचे प्रतिपादन कंपनीचे फॅक्टरी जनरल मॅनेजर बाळाराम म्हात्रे यांनी केले. यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी अल्टा कंपनी व्यवस्थापनाचे कौतुक करताना अश्या स्वरूपाची मदत झाल्याने आपत्कालीन प्रसंगी भरीव कामगिरी करणे शक्य होईल असे मत व्यक्त करत अजूनही काही संसाधनांची आवश्यकता असल्यास ती पुरवली जातील असे आश्वासन दिले. खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयात हा हस्तांतरण सोहळा पार पडला.

इतर बातम्या