‘सद्गुरू संगीत सदन’ प्रस्तुत ‘रिधुन – दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणावळा : लोणावळ्यातील गुलाबी थंडीच्या प्रसन्न वातावरणात श्रीराम मंदिर, भांगरवाडी येथे सद्गुरू संगीत सदन प्रस्तुत ‘सप्तसुरांची संगीत व प्रकाशमय रिधुन – दिवाळी पहाट’ हा दिवाळी पाडव्याचा सांगीतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, भजन आणि फ्युजन संगीताच्या सुरेल मेजवानीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. दीपप्रज्वलनासाठी लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सुरेखाताई जाधव, श्रीधर पुजारी, शरद कुलकर्णी, सीमा कुलकर्णी, राधिका भोंडे, दत्तात्रय येवले, महेश खराडे, नारायण पाळेकर, सुरेश गायकवाड, किरीट जोशी, श्रीराम कुमठेकर, चंद्रकांत जोशी, मृदुला पाटील, गोरख चौधरी, गिरीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर हर्षदा मानकर यांनी आपल्या नृत्याविष्कारातून सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली.
रसिकांना विशेष उत्सुकता असलेल्या गायनाच्या मुख्य सत्रात सारेगमप लिटिल चॅम्प विजेते शुभम खंडाळकर आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांनी ‘प्रथम तुला वंदितो’, ‘तुज मागतो’ आणि ‘सूर निरागस हो’ या गीतांचे सुरेल एकत्रित सादरीकरण केले. ज्ञानेश्वरी गाडगे हिने ‘भेटी लागी जीवा’, ‘भाग्यदा लक्ष्मी’, ‘सुरत पिया की’ आणि ‘पायोजी मैने’ या गीतांतून आपल्या बहारदार गायकीची छाप पाडली. तर प्रसिद्ध गायक शुभम खंडाळकर यांनी अहिर भैरव रागातील ‘अलबेला साजन आयो रे’, राग जोगमधील हनुमान स्तुती ‘हनुमान लला मेरे प्यारे’, त्यानंतर तराना, ‘बोलो राम राम’ आणि ‘बाजे मुरलिया’ या रचनांचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
लोणावळ्यातील सुप्रसिद्ध गायिका मीनाक्षी गायकवाड यांनी ‘हृदयी प्रीत जागते’ आणि ‘श्याम तेरी बन्सी’ या गीतांनी मैफलीत रंग भरला. शुभम खंडाळकर आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांनी ‘अभंग रंग’ या सादरीकरणातून पारंपरिक अभंगांची भक्तिमय अनुभूती रसिकांना दिली. ‘गरज गरज आज मेघ’ या मेघ मल्हार रागावर आधारित फ्युजन सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. शेवटी ‘धन्य भाग सेवा का अवसर पायो’ आणि ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ या भैरवीने या सुरेल मैफलीची भक्तिमय सांगता झाली.
या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी गाडगे (गायन), शुभम खंडाळकर (गायन), मनोज कदम (तबला व संस्थापक – सद्गुरू संगीत सदन), अझरुद्दीन शेख (बासरी), कार्तिकी गाडगे (संवादिनी), मीनाक्षी गायकवाड (गायन), पंडित विजय चंद्रा (सिंथेसायझर), बापूलाल तारे (निवेदन), विशेष कालेकर, अमेय परब, चैतन्य जायगुडे, केतन केदारी (साइड रिदम) आणि आर्य घंगाळे (कहोन) यांनी सहभाग घेतला. ध्वनी व्यवस्था मनोज व कुमार हारपुडे (मोरया साउंड) यांनी सांभाळली, तर मंडप व्यवस्था विशाल दिघे यांनी केली.
या सांगीतिक उपक्रमाला सहकार्य करणाऱ्यांमध्ये शरद कुलकर्णी (ओमकार हॉस्पिटॅलिटी), दत्तात्रय येवले, भावेश परमार, सुमित गवळी, ॲड. प्रथमेश रजपूत, अनिल गायकवाड, सौ. रेशमा पाठारे, भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्था, कौस्तुभ दामले, विक्की पालरेशा, ॲड. सुहास नागेश, सौ. वैशाली साखरेकर आणि नंदकुमार वाळंज यांचे मोलाचे योगदान लाभले.
दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे संगीत, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला लोणावळ्यातील नागरिक व संगीतप्रेमी रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भारतीय संगीत परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने लोणावळ्याच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला.


















