Breaking news

मोठी बातमी : मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाजाची आज दुपारी निर्णायक बैठक

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाज बांधवांची आज दुपारी तीन वाजता निर्णय बैठक वाकसई येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान या ठिकाणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक होणार असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

      महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात व सगे सोयरे हा अध्यादेश काढला मात्र त्याचे कायद्यात रूपांतर न करत मराठा समाजाची फसवणूक केल्याने महाराष्ट्रातील सकल मराठा समाज हा महाराष्ट्र शासनावर नाराज आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा स्वरूपाची भूमिका मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा क्षेत्रातील समाज बांधवांची भूमिका जाणून घेऊन त्याचा अहवाल 30 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावांमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे घेण्याचे काम सुरू आहे. जवळपास 80 ते 100 उमेदवारांची नावे ही सोशल मीडियावर फिरत आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सकल मराठा समाज काय भूमिका घेणार, यावर विजयाची गणिते सर्वत्र ठरणार असल्याने आज दुपारी मावळ विधानसभा क्षेत्रातील समाज बांधवांच्या होणाऱ्या निर्णायक बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रत्येक गावातील समाज बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहून आपल्या गावाची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन सकल मराठा समाज मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

     

इतर बातम्या