ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
लोणावळा : ठोंबरेवाडी लोणावळा येथील एका बंगल्यामध्ये शंभर वर्ष होऊन अधिक काळ माळी काम करणाऱ्या देशमुख परिवार यांच्या कुटुंबाला घराबाहेर काढण्यासाठी महिला व पुरुष बाउन्सर चा वापर करण्यात आला. नागपंचमीच्या दिवशी सकाळी सात वाजता तीस ते पस्तीस जण त्यांच्या बंगल्यामध्ये बसून त्यांच्या साहित्याची मोडतोड करत शिवीगाळ करत त्यांना घराबाहेर काढू लागले. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक धनंजय काळोखे यांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले त्यांना देखील त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली. यानंतर 112 नंबर वर फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आले. त्यावेळी गुंडगिरी करणारे पुरुष पडून गेले व दहा-बारा बाऊन्सर महिला पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
गुंडगिरी दादागिरी करत गोरगरिबांना घराबाहेर काढण्याची कारस्थान झाले असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी स्थानिक नगरसेवक धनंजय काळोखे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे नगरसेवक निखिल कवीश्वर व लोणावळा नगर परिषदेच्या जवळपास डझनभर नगरसेवकांनी पोलिसांकडे केली मात्र पोलिसांनी या मागणीकडे दुर्लक्ष करत गुन्हा दाखल करण्यात चाल ढकल केली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक हे पोलीस स्टेशनच्या पायरीवर ठिय्या मांडून बसले असताना देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांकडून जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यामध्ये चालढकल केली जात असल्याचा आरोप नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेवक धनंजय काळोखे यांनी केला आहे. दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस ठाण्यात दाखल झाले. मला सर्व प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेऊ मला थोडा वेळ द्या असे म्हणत त्यांनी देखील या प्रकरणी कारवाई करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने काही नगरसेवकांनी संताप व्यक्त करत पोलीस स्टेशन बाहेर निघून जाण्यास पसंती दिली.
लोणावळा शहरामध्ये मागील शेकडो वर्षांपासून मुंबई भागातील नागरिकांचे बंगले आहेत. या बंगल्यांची काळजी घेण्यासाठी दोन, तीन, चार पिढ्यांपासून काही कुटुंब माळी काम करत आहेत. अशा कुटुंबांना सदरचे बंगले विक्री करण्याचे वेळेस कोणताही मोबदला न देता त्यांना दादागिरी व दमदाटी करून बेघर करण्याचे प्रकार काही सुपारी बाज मंडळी करत आहेत. याकरिता बाउन्सर चा वापर करणे, गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांचा वापर करणे असे प्रकार लोणावळा शहर व परिसरात सर्रास सुरू आहेत. पोलीस प्रशासन देखील अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर ठोस कारवाई करत नसल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे. लोणावळा शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष व नगरसेवक सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याची मागणी करत असताना देखील कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुंडगिरी करणाऱ्या बाउन्सर व इतरांनी तीन महिन्यापूर्वी ह्याच ठिकाणच्या एका बंगल्यावर बेकायदेशीर होत्या ताबा मिळवला आहे. व आज सोमवारी सकाळी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होत होती मात्र लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे पडवळ कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात त्यांना अपयश आले आहे. पुन्हा पुन्हा असे प्रकार घडू नयेत याकरिता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा लोणावळा शहरांमध्ये मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा नगरसेवक धनंजय काळोखे यांनी दिला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, मी ट्रेनिंग साठी बाहेर गेलो होतो मात्र घटना समजतात मी तात्काळ पोलिसांना घटनास्थळी पाठवत संबंधितांना ताब्यात घेतले आहे. कोणावरही मी अन्याय होऊ देणार नाही असे म्हणत योग्य ती कारवाई करू असे म्हटले आहे. मात्र उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
सकाळपासून लोणावळा शहरातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते देशमुख कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये उपाशी तापाशी बसलेले असताना देखील पोलीस कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास शंभर ते दीडशे नागरिक सकाळपासून पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून बसले आहेत.



















