Breaking news

आई एकविरा देवीच्या माहेरघरात रंगला भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा

लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात सुरुवात झाली आहे. आज (14 एप्रिल) षष्टी च्या दिवशी आई एकविरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघरात देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. दुपारपासून मुंबई, रायगड, कोकण, तळकोकण भागातून आलेल्या आई एकविरा देवीच्या पालख्या याठिकाणी भाऊ काळभैरवनाथाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. रात्री पावणे आठ वाजता भैरवनाथ महाराजांची आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. भाविकांनी व श्री काळभैरवनाथ व महादेव देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी पालखी खांद्यावर घेतली. पालखी सोहळा शांततेमध्ये होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर हजारो भाविकांनी आज काळ भैरवनाथांचे दर्शन घेतले. काळो, आग्री समाजाती अनेक भाविक व पालख्या आज देवघरात दाखल झाल्याने देवघरचा परिसर गजबजला आहे. पालखी सोहळ्यानंतर भाविकांनी श्री एकविरा देवी मंदिराकडे कूच केली. 

    श्री काळभैरवनाथ व महादेव देवस्थान ट्रस्ट व श्री काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार समितीच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत व सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांच्या टिमने बंदोबस्ताचे नियोजन केले होते. वाकसई फाटा येथे सर्व मोठी वाहने थांबवण्यात आली होती. यात्रे निमित्त देवघर, वेहेरगाव, कार्ला परिसर भाविकांनी गजबजला असून सर्वत्र भाविकच भाविक पहायला मिळत आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

    बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 350 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सोबतच अवजड वाहनांना कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान बंदी घालण्यात आली आहे.इतर बातम्या