Breaking news

मावळ लोकसभेचे उमेदवार घोषित होत नसल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांची घालमेल वाढली !

मावळ माझा न्युज नेटवर्क : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना पुणे जिल्ह्यामधील महत्त्वाचा मतदार संघ असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित होत नसल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. महाविकास आघाडी करून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्या नावाला महाविकास आघाडी मधील इतर पक्षांनी कोणताही आक्षेप घेतलेला नसल्याने त्यांनी मतदारसंघांमध्ये गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खासदार बारणे यांनी मतदारसंघात विविध विकास कामांची भूमिपूजन करत पुन्हा एकदा या मतदारसंघावर दावा केला आहे.

      महायुती कडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असली तरी या ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने या जागेवर दावा केला असून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांनी देखील या जागेवर दावा करत खासदार बारणे यांना उमेदवारी का देऊ नये याचा अहवाल पक्ष श्रेष्ठी कडे दिला आहे. महायुतीमध्ये मावळ लोकसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यावर आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून आज पर्यंत शिवसेनेचाच उमेदवार युतीमधून खासदार म्हणून निवडून गेलेला आहे. मात्र असे असताना देखील महायुती मधील इतर दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा करत जोरदार फिल्डिंग लावल्याने इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे. 

     राज्यभरामध्ये महायुती म्हणून भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा पवार गट हे निवडणुकांना सामोरे जात असल्याने कोणीही मित्र पक्षांवर टीका करू नये अशा स्वरूपाच्या सूचना वरिष्ठांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. उमेदवारी मागणे यात काही गैर नसले तरी इतरांची मने दुखावले जातील अशा प्रकारची वक्तव्य महायुतीमध्ये करू नका अशा सूचना वरिष्ठांनी दिल्यामुळे मागील काही दिवसांपासून महायुतीमधील आरोपांच्या फैरी ह्या थंडावल्या असल्या तरी उमेदवारीवर दावा मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे. दावे प्रतिदावे, आरोप, प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर अद्याप पर्यंत मावळचा उमेदवार जाहीर होत नसल्याने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह सर्वांचेच टेन्शन वाढले आहे. महायुतीमध्ये मावळ लोकसभेची जागा ही शिंदे गटालाच असल्याचे वारंवार बोलले जात आहे. मात्र उमेदवार जाहीर होत नसल्याने निवडणुका जाहीर होऊन व आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील महायुतीकडून अद्याप प्रचाराला सुरुवात झालेली नाही. ज्याला उमेदवारी द्यायची त्याला द्या मात्र लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, जेणेकरून प्रचारासाठी अधिकच वेळ देता येऊ शकतो अशा प्रकारची भूमिका महायुतीमधील तीनही पक्षांचे नेते व कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये महा विकास आघाडी व महायुती या दोन्हींच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने देखील गावोगावी भेटी देत उमेदवारांची नावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

इतर बातम्या