Lonavala News l लोणावळ्यात अंगणवाडीबाहेर अतिविषारी 'घोणस' साप आढळला; शिक्षिकेच्या तत्परतेमुळे मोठे दुर्घटना टळली
लोणावळा : लोणावळा शहरातील इंदिरानगर येथील अंगणवाडीच्या आवारात शुक्रवारी एक अत्यंत विषारी 'घोणस' जातीचा साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, अंगणवाडी शिक्षिकेने दाखवलेले प्रसंगावधान आणि सर्पमित्राच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, अंगणवाडीतील सर्व बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील गवळीवाडा भागातील अंगणवाडी शिक्षिका सौ. योगेश्री दिनेश गवळी या इंदिरानगर येथील अंगणवाडी चालवितात. नेहमीप्रमाणे अंगणवाडीत लहान मुले शिक्षण व खेळाचा आनंद घेत असताना, अचानक अंगणवाडीच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा आणि अतिविषारी 'घोणस' साप दिसून आला.
परिस्थितीचे गांभीर्य तत्काळ ओळखून शिक्षिका सौ. योगेश्री गवळी यांनी अत्यंत धीराने आणि वेळेचे भान ठेवून अंगणवाडीतील सर्व लहान मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी देखील मदतीसाठी धाव घेत बालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठे सहकार्य केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणावळ्यातील सर्पमित्र रुपेश वीर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने त्या अतिविषारी घोणस सापाला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
















