Breaking news

Election Update : कसब्यातून 28 लाख तर चिंचवड मधून 14 लाखांची रोकड जप्त

पुणे : कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत 5 ठिकाणाहूम 28 लाख रुपये तर चिंचवड मतदार संघात भाजी मंडई परिसरातून 14 लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात घेण्यात आली आहे.

      कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने 13 हजार 542 वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये 28 लाख 18 हजार 500 इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी 6 वाजेपासून प्रतिबंध आहेत.  पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.

    चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर सनियंत्रण पथकाने (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) आज दुपारी दळवीनगर मधील भाजी मंडई परिसरात एका वाहनात आढळून आलेली सुमारे 14 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाने ही कामगिरी केली आहे. या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तात्काळ याबाबत आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन  आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करुन आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

इतर बातम्या