Breaking news

Police Custody : कोथुर्णे अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी दोघांना 10 ऑगस्ट पर्यत पोलीस कस्टडी

लोणावळा : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी व त्याला मदत करणारी त्याची आई या दोघांना न्यायालयाने 10 ऑगस्ट पर्यत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अपहरणाच्या घटनेनंतर 24 तासाच्या आतच कामशेत पोलिसांनी आरोपी तेजस महिपती दळवी (वय 24, रा. कोथुर्णे) याला अटक केली होती. तर तपासात मिळालेल्या माहितीवरून त्याची आई सुजाता महिपती दळवी यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना सदरची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचे मावळ तालुक्यात संतप्त पडसाद उमटले असून आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सर्वपक्षीय नेते व सर्वसामान्य मावळकर करत आहे. या निंदनीय घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज पवनानगर येथे निषेध सभा झाली. यावेळी उपस्थितांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आमदार उमा खापरे यांनी सभेत आरोपींच्या फाशीची मागणी करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत लेखी मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी मयत मुलीच्या आई वडिलांची व ग्रामस्तांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच आरोपींना फाशी व्हावी यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या संपुर्ण घटनेचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत शहरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करत आहेत. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेता त्यांनी अतिशय वेगात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपी निष्पन्न करत त्यांना अटक केली आहे. पुढील तपासात या घटनेचा उलगडा होईल तसेच वैद्यकीय अहवालात अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

इतर बातम्या