Breaking news

अपक्ष उमेदवार देणार नाही; मराठा आरक्षणाला मदत न करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करा - मनोज जरांगे पाटील

मावळ माझा न्युज नेटवर्क : कोणाच्याही हट्टा पायी मी उमेदवार देऊन समाजाला चिखलात ढकलणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार देणार नाही. मराठा कुणबी एकच आहे. सगेसोयरे अंमलबजावणी सह मराठा आरक्षणाला जो उमेदवार पाठिंबा देईल त्याला मदत करा व विरोध करणाऱ्याला पाडा अशा शब्दांमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

     समन्वयक मंडळींना विधानसभा निहाय बैठका घेत मराठा समाजाच्या मतांचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र वेळ कमी पडल्याने अपुरे अहवाल आले आहेत. राजकारणापुढे आरक्षणाचा मुद्दा मागे पडत आहे. त्यामुळे आरक्षण व लेकरांचे आयुष्याचे वाटोळे होऊ नये याकरिता लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. विधानसभेची तयारी आतापासून करू त्यावेळी फक्त मराठाच नाही तरी इतर जाती धर्माच्या लोकांना देखील सोबत घेऊ. आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा मात्र ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. 

     राजकारणात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येत नाहीत. राजकारण व समाजकारण यांची गणिते वेगळी असतात, राजकारणात प्रत्येक मतदाराची मने जिंकावी लागतात. त्यांच्या प्रश्नांना हात घालावा लागतो. राजकारण सोपे नाही, त्यामध्ये आपली जात हरवू नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मराठा समाजाने ध्यानात घ्यावे असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षणाच्या मागणीची लढाई सुरू असताना कोणी मदत केली, कोणी विरोध केला हे मराठा समाजाला माहित आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघांमध्ये कोणाला मदत करायची व कोणाचा कार्यक्रम करायचा हे मराठा मतदार ठरवतील. घाई घाई मध्ये अपक्ष उमेदवार उभे करत जात मातीमध्ये घालणार नाही. सहा महिन्यानंतर विधानसभा आहे त्यावेळेस योग्य ती तयारी करून निर्णय घेऊ असे जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर दौरे करून सभा घेणार असल्याचे पाटलांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या