मोठी बातमी l एकविरा देवस्थान परिसरातील प्रलंबित समस्यांसाठी ग्रामस्थांचे उद्या रास्ता रोको आंदोलन
लोणावळा : श्री क्षेत्र एकविरा देवी देवस्थान परिसरातील विविध प्रलंबित मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी वेहेरगाव-दहिवली ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक तसेच एकविरा देवीचे भाविक रविवारी (३० ऑगस्ट) रास्तारोको आंदोलन करणार आहेत. प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, श्री आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. त्यामुळे देवस्थान परिसरात वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग, सुरक्षित पायवाट, पोलीस बंदोबस्त यांसह विविध समस्या निर्माण होत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी संबंधित शासकीय विभागांकडे अनेक वर्षांपासून निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
रविवारी दुपारी 2 वाजता श्री एकविरा देवी पायथा मंदिर येथून कार्ला फाट्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर जुना मुंबई-पुणे महामार्गावरील कार्ला फाटा येथे बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
या आहेत ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
वेहेरगाव येथील फनिक्युलर रेल्वे (रोपवे) प्रकल्प रद्द करण्याची मागणी : वेहेरगाव-दहिवली ग्रामपंचायत हद्दीत प्रस्तावित फनिक्युलर रेल्वे प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार, पर्यावरण, पाण्याचे स्रोत आणि ग्रामस्थांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिकांचा रोजगार हिरावला जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, असा दावा करत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्ला फाटा ते देवस्थान पायथा रस्ता पूर्ण करावा : कार्ला फाटा ते श्री आई एकविरा देवस्थान पायथा मंदिर व मडावर जाणाऱ्या रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कायमस्वरूपी पोलीस चौकीची मागणी : देवस्थान परिसरात वाढणारी गर्दी, चोरीच्या घटना आणि भाविकांमध्ये होणारे वाद लक्षात घेता कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी. या चौकीत किमान एक पोलीस अधिकारी आणि दहा पोलीस शिपाई नियुक्त करावेत, अशी मागणी आहे.
पायऱ्यांच्या कामाच्या दर्जाची चौकशी : भाविकांसाठी पायऱ्या, पायवाट आणि सुरक्षित ये-जा व्यवस्था करण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करून उच्च दर्जाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत : देवस्थान परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याची तसेच ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अधिकृत वाहनतळासाठी जागा द्यावी : एकविरा देवी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या ताब्यात असलेली आवश्यक जमीन अधिकृत वाहनतळ उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवस्थान परिसरातील गैरप्रकारांवर कारवाईची मागणी : सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवून तसेच मद्यपान करून देवस्थानचे पावित्र्य धोक्यात आणणाऱ्या बेशिस्त व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी आणि अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

















