Breaking news

Lonavala News : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाने सर्वस्व झोकून आपलं योगदान दिले - चित्रा वाघ

लोणावळा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अगदी सुरुवातीपासून आदिवासी समाज लढला असून, आपलं सर्वस्व झोकून देऊन या समाजाने स्वातंत्र्य लढयात आपलं योगदान दिलं आहे असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले. लोणावळा शहरात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी समाज मेळाव्यात त्या बोलत होत्या. आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेच्या वतीनं मंगळवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या निमित्त लोणावळा शहरात शोभा यात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधन व्याख्याने इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून चित्रा वाघ या उपस्थित होत्या. मुख्य प्रवाहापासून आजवर वंचित राहिलेल्या आदिवासी समाजाला, आदिवासी महिलांना उज्वला गॅस योजना, शौचालय, स्वतःच घर अशा विविध योजना आणि सुविधा उपलब्ध करून देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं काम मोदी सरकारने केलं असल्याच सांगत चित्रा वाघ यांनी मातृशक्तीला खऱ्या अर्थाने बळ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे प्रतिपादन केले. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचे सरकार आहे, तुमचं आमचं सरकार आहे, समाजातील प्रत्येक घटकांचे सरकार आहे. त्यामुळे अशा समाजाला न्याय मिळवून देण्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार आहे. सरकारी लाभ हे प्रत्येक घराघरात पोचतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

      माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी पं. स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, माजी नगरसेविका रचना सिनकर, मावळ भाजपा अध्यक्षा सायली बोत्रे, रॉबर्ट त्रिभुवन, नितीन साबळे, अविनाश ठोंबरे, संजय माने आदींसह आदिवासी समाजातील मान्यवर मंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश धानिवले यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत सचिव संदीप उंबरे यांनी केले. आदीवासी समाज बांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनून राहिलेल्या जातीच्या दाखल्याचा विषय या मेळाव्यात प्रामुख्याने मांडण्यात आला. जातीचा दाखला मिळवताना येणाऱ्या अनंत अडचणी यावेळी जवळपास प्रत्येक वक्त्याने मांडल्या. तसे निवेदन देखील यावेळी आदिवासी विभागाला देण्यात आले. सरकारकडून आणि यंत्रणांकडून हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असा आशावाद यावेळी मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. 

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या निमित्त लोणावळा शहरात भर पावसात भव्य शोभायात्रा

लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत असतानाही त्याची तमा न बाळगता आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत आदिवासी समाज बांधवांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ढोल ताशा आणि डी.जे.च्या तालावर आदिवासी तरुण, तरुणींने आपले पारंपरिक नृत्य सादर करीत आपला उत्साह दाखवून दिला. अनेकजण आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि वनदेवता असलेल्या वाघोबाच्या वेषात या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

इतर बातम्या