महसूल अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर भाजे ग्रामस्थांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
लोणावळा : मावळ तालुक्यातील भाजे येथील गट क्रमांक १०० या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात महत्त्वाची प्रशासकीय बाब समोर आली आहे. या जमिनीच्या महसुली अभिलेखांमध्ये जुन्या फेरफार नोंदींबाबत विसंगती आणि एका फेरफार नोंदीत खाडाखोड झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. सदरची जागा ही भाजे गावाचे गायरान असल्यामुळे तिच्या बाबत झालेले सर्व व्यवहार हे रद्द करावेत व सदरची जागा भाजे गावाचे गायरान म्हणून घोषित करावी या मागणीसाठी भाजे ग्रामस्थांच्या वतीने 29 ऑक्टोबर रोजी वडगाव मावळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान फेरफार क्रमांक ३७९ आणि ५७० यांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम २५८ अन्वये पुनर्विलोकन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळावी, अशी विनंती मावळ-मुळशी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केली आहे.
जुन्या महसुली अभिलेखांतून जमिनीचा इतिहास उघड होणार
उपलब्ध अहवालानुसार, मौजे भाजे येथील गट क्रमांक १०० हा पूर्वीचा सर्व्हे क्रमांक ६१ असून, या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ४० एकर १७ गुंठे होते. जुन्या सातबारा उताऱ्यांनुसार या जमिनीच्या अभिलेखांमध्ये समाईक इनामदार, गायरान डोंगर आणि संबंधित व्यक्तींच्या नावांच्या नोंदी वेगवेगळ्या कालखंडांत आढळतात.
सन १९५३-५४ पासूनच्या महसुली नोंदींमध्ये कोंडीबा धाकू धनगर यांचे नाव दाखल झाल्याचे दिसते. त्यानंतरच्या फेरफार नोंदींमध्ये कुळांची नावे, त्यांची वहिवाट आणि जमिनीच्या नोंदींमध्ये करण्यात आलेल्या बदलांचा उल्लेख आहे. मात्र, काही जुन्या फेरफार नोंदी अभिलेख कक्षात उपलब्ध नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
फेरफार क्रमांक ५७० मधील खाडाखोडीचा मुद्दा ऐरणीवर
जमिनीच्या अभिलेखांची तपासणी करताना फेरफार क्रमांक ५७० मध्ये खाडाखोड झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या फेरफाराच्या अनुषंगाने यापूर्वी दाखल असलेल्या कुळांची नावे कमी करण्यात आली, तसेच कोंडीबा धाकू धनगर यांचे नाव कमी करून जमीन सार्वजनिक गायरान म्हणून नोंदविण्याची कार्यवाही झाल्याचा उल्लेख अहवालात आहे.
तथापि, संबंधित फेरफार नोंदीतील बदल आणि त्यानंतर झालेल्या नोंदींच्या पार्श्वभूमीवर फेरफार क्रमांक ३७९ व ५७० यांची पुन्हा तपासणी करून गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमाचा शेरा कायम
गट क्रमांक १०० च्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र खाजगी वन अधिनियमातील तरतुदींना अधीन असल्याचा शेरा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या जमिनीच्या हक्कांबाबत आणि व्यवहारांबाबत महसुली अभिलेखांचे महत्त्व वाढले आहे. अहवालानुसार, दुय्यम निबंधक, मुळशी यांच्या कार्यालयात ९ जुलै २०२६ रोजी दस्त क्रमांक ६५४५/२०२६ अन्वये हक्कसोडपत्राची नोंद झाली. त्यानंतर ३ ऑगस्ट २०२६ रोजी दस्त क्रमांक ७३७०/२०२६ अन्वये जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी १५ हेक्टर १० आर क्षेत्राचे खरेदीखत नोंदविण्यात आले.
या दस्तांच्या आधारे अनुक्रमे फेरफार क्रमांक १५९५ आणि १६०० नोंदविण्यात आले. मात्र, या नोंदींना भाजे येथील ग्रामस्थ आणि इतर संबंधितांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे दोन्ही फेरफारांबाबत मंडल अधिकारी, कार्ला यांच्या कार्यालयात कार्यवाही सुरू असल्याचे अहवालात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी सादर केलेल्या अहवालात फेरफार क्रमांक ३७९ आणि ५७० यांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम २५८ अन्वये पुनर्विलोकन करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या परवानगीनंतर संबंधित जुन्या नोंदींची कायदेशीर तपासणी करून त्यांच्या वैधतेबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. भाजे येथील गट क्रमांक १०० च्या जमिनीच्या मालकी हक्कांबाबत, जुन्या महसुली नोंदींच्या वैधतेबाबत आणि नव्याने नोंदविण्यात आलेल्या व्यवहारांबाबत आता जिल्हाधिकारी स्तरावर काय निर्णय होतो, याकडे संबंधित ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.















