स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप
लोणावळा : शिक्षणातून प्रगतीचा ध्यास घेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान, मावळ यांच्या वतीने स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कान्हे येथे शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथी व सातवीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तकसंचांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधणे, त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन व तयारीची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.
या कार्यक्रमास माथाडी कामगार नेते तथा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा पै. किशोरशेठ पंढरीनाथ सातकर, गटशिक्षण अधिकारी श्रीमती शिल्पा रोडगे, शिक्षणविस्तार अधिकारी श्री. सुदाम वाळुंज सर, केंद्रप्रमुख सौ. निर्मला काळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. विकास मधुकर सातकर, खजिनदार व युवा उद्योजक श्री. अमोल पंढरीनाथ सातकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. प्रसाद गंगाराम सातकर, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष श्री. सुशांत दिलीप बालगुडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका कु. सुकेशिनी कोले मॅडम उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षक वृंद कान्हे, समिती सदस्य, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व माथाडी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकेशिनी कोले यांनी केले. सूत्रसंचालन सुहास धस यांनी केले, तर आभार प्रदर्शन निर्मला काळे यांनी मानले.
स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या स्मृती जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील भावी पिढी घडविण्याचा प्रतिष्ठानचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी असे उपक्रम प्रेरणादायी असून, “सेवा, संस्कार आणि शिक्षण हाच प्रगतीचा खरा मार्ग” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
















