मावळ तालुक्यातील भाजे गावात डोंगर गायरान जमिनीच्या खरेदी-विक्रीचा प्रकार उघड; 9 जणांवर गुन्हा दाखल - ग्रामस्थांचे २९ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
लोणावळा : लोहगड व विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मावळ तालुक्यातील ऐतिहासिक भाजे गावातील डोंगर गायरान जमिनीची खरेदी-विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवरून पौड पोलीस ठाण्यामध्ये नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या भाजे गावातील समस्त ग्रामस्थांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
भाजे ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत गावाच्या गायरान जमिनीची खरेदी विक्री झाली असल्याची माहिती दिली. या प्रकरणातील फिर्यादी रघुनाथ मराठे म्हणाले, भाजे गावातील सर्व्हे नंबर ६१ (नवीन गट नंबर १००, क्षेत्र १६ हेक्टर ३६ आर) ही जमीन सन १९४२ पासून सातबारा उताऱ्यावर डोंगर गायरान' आणि 'सामायिक इनामदार' म्हणून नोंदवलेली आहे. १९५४-५५ नंतर कागदपत्रांमध्ये कोणतीही कायदेशीर पूर्तता नसताना काही जणांची नावे बेकायदेशीरपणे कुळ किंवा इतर हक्कांमध्ये समाविष्ट करण्यात आली. २०१५-१६ मध्ये सातबारे ऑनलाइन होत असताना तलाठ्याच्या चुकीमुळे सामाईक असा शेरा आला, तर इतर हक्कांत 'महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम १९७५' नुसार महाराष्ट्र शासन वने असा स्पष्ट शेरा आहे. हे सर्व कायदेशीर पुरावे आणि खाजगी वनशेरा असतानाही, ३ ऑगस्ट २०२६ रोजी दस्त क्रमांक ७३७०/२०२६ द्वारे सदर डोंगर गायरान जमीन काही एजंट आणि खरेदीदारांच्या नावे खरेदी-विक्री करण्यात आली.
ग्रामस्थ म्हणाले, दस्त नोंदणी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच ५ ऑगस्ट २०२६ रोजी मुळशी-पौडचे दुय्यम निबंधक श्री. एम. व्ही. क्षीरसागर यांनी भाजेच्या गावकामगार तलाठ्यांना पत्र लिहून कबूल केले की, “मिळकतीची नोंदणी करताना सातबारावरील खाजगी वनशेरा तपासायचा राहून गेला व अनावधानाने खरेदी खताचा दस्त नोंदवला गेला, त्यामुळे या खरेदी खतावरील फेरफाराची नोंद रद्द करण्यात यावी.” असे असूनही प्रत्यक्षात प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नाही. याप्रकरणी भाजे ग्रामस्थांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी महसूल मंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधीक्षक, दुय्यम निबंधक यांसह तब्बल १२ वरिष्ठ सरकारी कार्यालयांमध्ये आणि पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी अर्ज देऊन रीतसर पोहोच घेतल्या. मात्र, महसूल प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.
अखेर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आक्रमक होत ग्रामस्थांनी पौड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शासकीय नियमांना व वनांच्या जमिनीच्या कायद्याला डावलून झालेल्या या व्यवहाराविरोधात ग्रामस्थांनी आता २९ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला आहे. भाजे गावाचे गायरान हे पुन्हा भाजे गावाच्या नावावर व्हावे. गायरानाच्या जागेची खरेदी विक्री करणारे व त्यांना सहाय्य करणारे खाजगी व्यक्ती व सरकारी अधिकारी कर्मचारी या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजे ग्रामस्थांनी केली आहे.
बाळू गबळू मरगळे, शंकर धोंडीबा मरगळे, संगीता गबळू मरगळे, मंगल गबळू मरगळे (सर्व राहणार मळवली भाजे), सत्यजित वाजपेयी, सुनंदा सत्यजित वाजपेयी (दोघे राहणार खारपाडा पेन रायगड), हिया अभय कुंदालिया (खारघर रायगड), अविनाश जांभुळकर (कुरवंडे लोणावळा), पार्थ अशोकभाई कटारिया (काळाचौकी पुणे) या नऊ जणांवर पौड पोलीस ठाण्यात फिर्यादी रघुनाथ मराठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















