Breaking news

Lonavala News l लोणावळा शांती चौकातील कचऱ्याचा तो ढीग अखेर उचलला !

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या लोणावळा शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून पुन्हा सर्वत्र कचरा दिसू लागला आहे. शांती चौक या रेल्वे स्टेशन व बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या कडेलाच मागील एक ते दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग पडला होता व दिवसेंदिवस तो वाढत होता. असे असताना लोणावळा नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी ना कचरा उचलला गेला ना रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली. मावळ माझा न्युज मध्ये या ठिकाणच्या कचऱ्याचे ढीग दाखवण्यात आल्यानंतर लोणावळा नगर परिषदेने तातडीने याची दखल घेत त्याच दिवशी दुपारी सदरचा कचरा उचलून घेतला आहे तसेच या ठिकाणी कचरा टाकू नये याबाबतची सक्त ताकीद आजूबाजूचे रहिवासी व व्यवसायिकांना दिली आहे.

     मागील काही वर्षांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लोणावळा शहराने मोठी झेप घेतली होती. सध्या स्वच्छतेच्या कामांमध्ये सातत्य राखले जात नसल्यामुळे शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. पायी चालणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. लोणावळा शहरात अनेक ठिकाणी कचरा दिसू लागला आहे. कोट्यवधी रुपये स्वच्छतेवर खर्च करून देखील शहरात स्वच्छता राखली जात नसल्यामुळे हा पैसे नेमका जातो तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच लोणावळा नगरपरिषद आरोग्य विभागाचे देखील स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. 

     मावळ माझा न्युज मध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेने याची तातडीने दखल घेत सर्व कचरा उचलून घेतला आहे. मात्र त्याठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी तसेच नागरिकांनी देखील उघड्यावर कोठेही कचरा टाकू नये, आपले शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

इतर बातम्या

लोणावळा दहीहंडी लोकोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष l लोणावळा दहीहंडी लोक महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना आरोग्य संपदा राखण्यासोबतच व्यसनमुक्ती बाबत होणार जनजागृती

कर्ज देण्याच्या बहाण्याने बुटाला परिवाराने आमच्या घराचे खरेदीखत केल्याचा रांगणे परिवाराचा आरोप; कायदेशीर दस्तेवज करून घर विकत घेतल्याचा बुटाला परिवाराचा खुलासा