Breaking news

कर्ज देण्याच्या बहाण्याने बुटाला परिवाराने आमच्या घराचे खरेदीखत केल्याचा रांगणे परिवाराचा आरोप; कायदेशीर दस्तेवज करून घर विकत घेतल्याचा बुटाला परिवाराचा खुलासा

लोणावळा : भांगरवाडी येथील रहिवासी असलेल्या रांगणे परिवार व बुटाला परिवार यांच्यात एक फ्लॅट खरेदी विक्री वरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 2022 साली कर्ज देण्याच्या बहाण्याने माजी नगरसेविका अर्पणा बुटाला यांनी आमच्या घराचे खरेदीखत व भाडेकरार करून घेत आमची फसवणूक केली असल्याचा आरोप ज्योती रांगणे यांनी केला आहे. तर लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ज्योती रांगणे व त्यांचे पती दीपक रांगणे यांनी कायदेशीर असाईनमेंट डीड व भाडेकरार करून आम्हाला फ्लॅटची विक्री केली असल्याचा खुलासा माजी नगरसेविका अर्पणा बुटाला यांनी केला आहे. 

       मागील तीन ते चार महिन्यापासून सदरचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणातील ज्योती रांगणे व दीपक रांगणे हे अपंग असल्याने व त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत माजी नगरसेविका अर्पणा बुटाला यांनी त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुरेखा ताई जाधव यांनी केला आहे. रांगणे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत व कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना घराबाहेर काढून देणार नाही, त्यांची फसवणूक झाली आहे व त्यांना त्यांचे हक्काचे घर परत मिळवून देण्यासाठी आम्ही ही लढाई लढत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना सौ. रांगणे म्हणाल्या फ्लॅटवर कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने सौ बुटाला यांनी आम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये घेऊन जात तेथे आमच्या सह्या घेतल्या सोबतच कोऱ्या चेक वर देखील सह्या घेतल्या व आमची फसवणूक केली आहे.

     याच प्रकरणाविषयी बोलताना सौ बुटाला म्हणाल्या, रांगणे परिवाराने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये येऊन आम्हाला असाईनमेंट डीड करून देत व त्यांना त्याच फ्लॅटमध्ये राहायचे असल्याने त्याच दिवशी भाडेकरार देखील करून दिलेला आहे. या बदल्यात 19 लाख रुपये मी त्यांना दिले आहेत. सुरुवातीला दीड वर्ष त्यांनी ठरल्याप्रमाणे सहा हजार रुपये मासिक भाडे दिले नंतर मात्र त्यांनी भाडे न दिल्यामुळे आम्ही त्यांना भाडेकरार बाबत नोटीस बजावली असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. लोणावळा शहर पोलिसांनी देखील दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून रांगणे यांचा अर्ज निकाली काढला आहे. 

     ज्योती रांगणे यांनी 19 लाखापैकी पाच लाख रुपये मला देत उर्वरित 14 लाख रुपये माझ्या बँक खात्यातून दोन कोऱ्या चेकवर सह्या घेत अन्य दोन महिलांच्या नावे सौ. बुटाला यांनी वर्ग केले असल्याचा आरोप केला आहे. बुटाला यांनी यावर बोलताना, रांगणे यांनीच सदरचे चेक त्या दोन महिलांना त्यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या रकमेच्या बदल्यात दिले असल्याचे म्हटले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे. मात्र निकाल लागण्यापूर्वी सुरू असलेली सोशल मीडिया ट्रायल व त्यामधून आमची सुरू असलेली बदनामी संबंधितांनी थांबवावी असे म्हटले आहे. ज्योती रांगणे व सुरेखाताई जाधव यांनी मात्र या प्रकरणात न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

इतर बातम्या

ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ