Breaking news

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, स्वातंत्र्याने, समानतेने आणि बंधुभावाने जीवन जगण्याची दिशा दिली

लोणावळा : भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, स्वातंत्र्याने, समानतेने आणि बंधुभावाने जीवन जगण्याची दिशा देणारा महान विचारांचा दस्तऐवज आहे. संविधानाने आपल्याला हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच कर्तव्यांचीही शिकवण दिली असून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे, असे ठाम प्रतिपादन पालक सदस्य सोनबा गोपाळे यांनी केले.

श्री एकवीरा विद्या मंदिर, कार्ला येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त करताना भारतीय संविधानाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. संविधानातील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाही मूल्यांवर उपस्थितांनी प्रकाश टाकला.

या सोहळ्याला पालक सदस्य सोनबा गोपाळे, कामगार नेते संदीप पानसरे, प्राचार्य संजय वंजारे, शिक्षक प्रतिनिधी विवेक भगत, मच्छिंद्र बारवकर, अलका आडकर, संगीता खराडे, संजय हुलावळे, नरेंद्र इंदापुरे, सचिन हुलावळे, उमेश इंगुळकर, वैजयंती कुल, श्रद्धा मोहोळ, पल्लवी दुश्मन, काजल गायकवाड, प्रणाली उंबरे, हिना इंगळे, गणेश बोंबले, बाबाजी हुलावळे आणि रोहिदास वाघवले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र बारवकर यांनी केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. स्नेहा पिंगळे आणि कु. अनुष्का तिकोणे यांनी सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली, तर अलका आडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

संविधानातील उदात्त मूल्यांची जाणीव भावी पिढीमध्ये रुजवून विद्यार्थ्यांना जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील नागरिक घडविण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

इतर बातम्या