वाकसई सदापूर रोड येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आंदोलन
लोणावळा : मुंबई पुणे जुन्या महामार्गालगत असणाऱ्या वाकसई सदापूर फाटा येथील कथित अनधिकृत बांधकाम व धार्मिक स्थळाच्या विरोधात बुधवारी हिंदूराष्ट्र सेना मावळ व ग्रामस्थ वाकसई यांच्या वतीने कार्ला फाटा येथे रास्ता रोको करण्याच्या हेतूने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. नंतर सर्व आंदोलनकर्ते व पोलीस यांच्यात सामंजस्य चर्चा झाल्यानंतर कार्ला फाटा येथून संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान वाकसई येथे येथून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व पीएमआरडीए तहसीलदार आशा होळकर यांनी आंदोलनकर्त्याना दि 23 नोव्हेंबर रोजी कायद्याच्या नियमाला धरून बांधकाम निष्कासित केले जाईल असे लेखी पत्र दिले व तूर्तास आंदोलन थांबविण्याची विनंती केली. परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहून जो पर्यंत बांधकाम पाडले जात नाही तोपर्यंत या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल असे म्हटले. आंदोलनकर्ते व ग्रामस्थ म्हणाले, वाकसई ग्रामपंचायत व पीएमआरडीए यांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या हे बांधकाम करण्यात आले आहे. कोणत्या ग्रामस्थांची देखील ते बांधकाम निष्कासित करण्याची मागणी आहे व पीएमआरडीए यांनी देखील हे बांधकाम बेकायदेशीर ठरवत ते काढून घेण्याचे आदेश दिलेले असताना देखील सदर बांधकाम व्यवसायिक या आदेशांना व सूचनांना केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे तातडीने हे बांधकाम निष्कासित करण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र सेना व वाकसाई ग्रामपंचायत वतीने करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील हिंदू राष्ट्र सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वाकसाई देवघर ग्रामस्थ व कार्ला परिसरातील ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी कार्ला फाटा ते आंदोलन स्थळापर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


















