Breaking news

लोणावळा शहरात सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेने समिती गठीत करावी - सूर्यकांत वाघमारे

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेने समिती गठीत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केली आहे. लोणावळा शहरामध्ये 2022 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेने हाती घेतले होते. मागील तीन वर्षापासून हे काम शहरात सुरू असून आतापर्यंत कामाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. व चौथ्या टप्प्याची निविदा देखील प्रसिद्ध झालेली आहे. असे असताना लोणावळा नगर परिषदेने या कामासंदर्भात चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्या समितीचे आम्ही स्वागत करतो पण एक महिन्यापूर्वी ही समिती स्थापन झाली असून आठ दिवसा तिचा अहवाल सादर होणे अपेक्षित होते मात्र अद्याप पर्यंत समितीचा अहवाल आलेला नाही व मागील आठ महिन्यापासून बंद असलेले काम देखील अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने सूर्यकांत वाघमारे यांनी घंटा मोर्चाचा इशारा दिल्यानंतर आज तातडीने त्यांना या कामा संदर्भातील पत्र देण्यात आले असून आचारसंहिता संपताच कामाला सुरुवात केली जाईल असे लेखी आश्वासन नगर परिषदेने दिले आहे. 

      याविषयी बोलताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले लोणावळा शहरामध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. अनेक कामांच्या बाबतीत विद्यमान नगरसेवकांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. अशा सर्व कामांवर समित्या गठित करून त्या कामांची चौकशी करावी. ती कामे योग्य प्रकारे सुरू आहेत की नाहीत, त्यामध्ये काही अनियमितता झाली आहे का याची पडताळणी करावी. लोणावळा नगर परिषदेचे रुग्णालय नगर परिषदेने ठराव करून शासनाला वर्ग केले त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू आहे. या रुग्णालयामध्ये नगरपरिषदेला कोणताही अधिकार राहिला नसल्याने नगरपरिषदेने या रुग्णालयाच्या कामावर स्थानिकांची समिती नियुक्त करत या कामावर नियंत्रण ठेवावे व या मागणीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे वाघमारे म्हणाले. सदरच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागाही नगरपरिषदेने विनामूल्य दिलेली आहे त्यामुळे या रुग्णालयामध्ये नगर परिषदेला व लोणावळा शहरातील नागरिकांना महत्त्वाचा सहभाग आवश्यक आहे असे सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले. लोणावळा नगर परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभापतींनी वरसोली येथील कचरा डेपो संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्या कामाची चौकशी करण्यासाठी देखील समिती स्थापन करावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम योग्य प्रकारे व दर्जेदार करण्यासाठी देखील समिती स्थापन करावी तसेच शहरांमध्ये इतर जी विकास कामे सुरू आहेत व जी कामे सुरू करायची आहेत त्या सर्व कामांवर समिती नियुक्त करत समितीच्या देखरेखीखाली ही सर्व कामे व्हावी अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

     भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक सुशोभीकरणाच्या कामामध्ये आर्थिक गैरप्रकार झाला असल्याच्या अफवा उठवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष अपेक्षित खर्चापेक्षा कमी खर्च या ठिकाणी झाला असून आत्तापर्यंत जवळपास एक कोटी रुपयांची बचत या कामांमध्ये झाली असल्याचे देखील वाघमारे यांनी सांगितले. वाघमारे म्हणाले या ठिकाणी समिती स्थापन केली त्या समितीचे आम्ही स्वागत करतो. समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी येऊन भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे, तसेच या कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवणे देखील गरजेचे आहे. लोणावळा शहरांमध्ये सुरू असलेली विकास कामे ही दर्जेदार व जनतेचा पैशाचा अपव्यय होणार नाही अशा पद्धतीने करायची असल्यास सर्व कामांवर समित्या नियुक्त करणे हे गरजेचे आहे व विद्यमान नगरपरिषद ते करेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, ज्येष्ठ नेते गणेश गायकवाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मालन बनसोडे, लोणावळा शहराध्यक्ष देसाई, अनिता वाघमारे, विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

इतर बातम्या