लोणावळा शहरात फुगे विकणाऱ्यांचा उपद्रव वाढला; आठ दिवसात कारवाई न झाल्यास लोणावळा भाजपाचा आंदोलनाचा इशारा
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये दिवसेंदिवस फुगे विकणाऱ्यांचा उपद्रव वाढला असून आठ दिवसात त्यावर कारवाई न झाल्यास लोणावळा नगरपरिषद व पोलीस स्टेशनच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा लोणावळा शहर भाजपाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी मागील काही दिवसांपासून फुगे विकणारी परराज्यातील काही मुले, मुली व त्यांचे कुटुंबीय आता लोणावळा शहरांमध्ये सर्वत्र दिसू लागले आहेत. लोणावळा बाजारपेठेमध्ये त्यांनी आपले बस्तान मांडले असून लोणावळा नगर परिषदेच्या इमारतीसमोर व नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्या दुकानासमोर त्यांचा मुक्काम सुरू झाला आहे.
रोज रात्री ही मंडळी या ठिकाणी रस्त्यावर अंथरून पांघरून टाकत झोपत आहेत. नगरपरिषदेच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेले स्वच्छतागृह, पाणी याचा वापर करत आहेत. तसेच या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी अस्वच्छता देखील निर्माण केली आहे. रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या नशेच्या अंमलाखाली असणारे ही मंडळी अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणे, एकमेकांना मारहाण करणे, असे प्रकार करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर व नागरिकांवर देखील ही मंडळी धावून येत आहेत. दिवसा देखील फुगे विकण्यासाठी लहान लहान मुले रस्त्यावर उभी असतात. अनेक वाहनांच्या मागेपुढे ते पळत असतात, लोणावळा शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या हातामधील वस्तू ओढून घेणे, त्यांच्या पर्स, मोबाईल अशा वस्तू लंपास करणे. खाद्यपदार्थ घेतल्यानंतर त्यांच्या हातातून खाद्य पदार्थ हिसकावून घेणे असे किळसवाणे प्रकार ही मंडळी करत आहेत. पूर्वी राष्ट्रीय महामार्गावर व त्याच्या आजूबाजूला ही मंडळी रहायची आता त्यांनी थेट नगरपरिषदेलाच आपले लक्ष केले आहे. नगरपरिषदेच्या आजूबाजूला अनेक छोट्या छोट्या वस्त्या आहेत. गावठाण आहे, एखादा अनुचित प्रकार घडल्यास लोणावळा शहरांमध्ये त्याची पडसाद उमटू शकतात, नशेसाठी लोणावळा शहरामध्ये भाजी मार्केटमध्ये झालेली सामूहिक हत्या ही अजूनही नागरिकांच्या स्मरणात आहे. याकरिता पोलीस प्रशासन व नगरपरिषदेने याची तातडीने दखल घेत संबंधितांवर कारवाई करावी व त्यांना जिथून आले आहेत त्या ठिकाणी परत घालून द्यावे अशी मागणी लोणावळा शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, लोणावळा भाजपा मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड महिला अध्यक्षा परिजा भिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोणावळा शहर पोलीस व लोणावळा मुख्याधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. लोणावळा रेल्वे अधिकारी व आयआरबी कंपनी यांना देखील निवेदने देण्यात आली असून हायवे लगत व रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये राहणाऱ्या या नागरिकांना शहराबाहेर पाठवून देण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यापूर्वी अनेक वेळा या मंडळींना त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले होते. मात्र ते पुन्हा पुन्हा शहरांमध्ये येऊन स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना त्रास देत असल्याच्या भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या या भावनांची व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची दखल घेत सर्व प्रशासनांनी मिळून या परराज्यातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी व त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवून द्यावे अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.





















