Breaking news

Accident News l लोणावळ्यात भरधाव कारची दुचाकीला धडक; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वलवण गावाच्या हद्दीत कारचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून लेन बदलताना दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विशाल पांडुरंग दाभाडे (वय २५, रा. बोरज, ता. मावळ, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वलवण येथील राधे टाईल्स दुकानासमोर घडला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल देवराम अडशिरे (वय ३९, रा. पाचणे, माऊलीनगर, ता. मावळ, जि. पुणे) हा टोयोटा ग्लान्झा कार (क्र. एमएच १४ केओ ९३१४) घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करत होता. दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या सुमारास त्याची कार वलवण गावाच्या हद्दीत राधे टाईल्स दुकानासमोर आली. यावेळी कारचालकाने भरधाव वेगात लेन बदलली आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर येत हिरो होंडा दुचाकीला (क्र. एमएच १४ एलझेड ६९७२) समोरून धडक दिली, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

या धडकेत दुचाकीस्वार विशाल दाभाडे गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेत कार आणि दुचाकी या दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी राहुल खंडू दाभाडे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. बोरज, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देविदास चाकणे करत आहेत.


इतर बातम्या