Breaking news

Khandala News l खंडाळा रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधा वाढवा; लोकल खंडाळ्यापर्यंत सुरू करण्याची खंडाळा ग्रामस्थांची मागणी

लोणावळा : मध्य रेल्वेच्या वतीने खंडाळा रेल्वे स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात स्थानिक नागरिक, नियमित प्रवासी आणि चाकरमान्यांनी रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध समस्या मांडल्या. कोविडनंतर कमी करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत, पुणे-लोणावळा लोकल सेवा खंडाळ्यापर्यंत विस्तारित करावी, तसेच बंद करण्यात आलेली तिकीट खिडकी पुन्हा सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली.

खंडाळा हे मुंबई-पुणे रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. याशिवाय स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि नियमित प्रवाशांचीही रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व आहे. त्यामुळे खंडाळा रेल्वे स्थानकावरील सुविधा आणि रेल्वे गाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.

कोविडपूर्व काळात उपलब्ध असलेले काही रेल्वे गाड्यांचे थांबे कोविडनंतर कमी करण्यात आले आहेत. हे थांबे पुन्हा पूर्ववत केल्यास स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे नागरिकांनी सांगितले. तसेच पुणे-लोणावळा लोकल सेवा खंडाळ्यापर्यंत सुरू केल्यास दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक कारणास्तव ज्या गाड्यांना खंडाळा स्थानकात थांबा दिला जातो, त्या गाड्यांचे थांबे प्रवाशांच्या दृष्टीनेही कायम ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वाणिज्यिक कारणास्तव खंडाळा रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यालय अर्थात तिकीट खिडकी बंद करण्यात आली होती. ही खिडकी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र बसविण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली. खंडाळा हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या, प्रवाशांची दैनंदिन गरज आणि उपलब्ध सुविधांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सर्वंकष सर्वेक्षण करावे. रेल्वे गाड्यांचे थांबे, तिकीट व्यवस्था आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

या जनसंवाद कार्यक्रमाला मध्य रेल्वेचे संकेत मिश्रा (सीएमपीई), अजय कुमार (डीसीएम गुड्स), डी. के. सिंग (स्टेशन मास्तर, खंडाळा), प्रवीण भोसले (डी.वाय. स्टेशन मॅनेजर लोणावळा), तसेच रेल्वे कर्मचारी अशोक डाक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) अधिकारी उपस्थित होते. खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, दिलीप ओसवाल, अशोक मानकर, सिताराम कचरे पाटील, गोपीचंद सोनवणे, संजय कदम, नरेंद्र कचरे पाटील, सुरेश गायकवाड, अनिकेत गायकवाड, सुमित गायकवाड, सुरेश काळे, वसंत ओसवाल, दिनेश जैन, राजन कदम, संजय कदम, दीपक घोरिंदे, विजय मातेरे, भीम कचरे पाटील, आबा पाटील, संपत काजळे, सनी सोळंकी, गणेश वाडकर, बिपिन मंडलिक, मिलिंद धुळे, धनंजय कदम, संदीप पवार, धैर्यशील थिते, तेजस थिटे, शशिकांत गायखे, गोरक्ष लोणकर, चंद्रकांत राऊत, राजेश महाडिक, योगेश सामंत, अनिकेत ओसवाल, श्याम खराडे, विजय मातेरे, गणेश फाटक व सिद्धू आदि मान्यवर उपस्थित होते.

या जन संवादातून खंडाळा रेल्वे स्थानकावरील प्रलंबित प्रश्न रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नागरिकांनी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.


इतर बातम्या