Breaking news

Karla News : श्री एकविरा देवी, दुर्गा परमेश्वरी, जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा समितीकडून वधू वरांना बस्ता वाटप

लोणावळा : श्री एकविरा देवी, दुर्गा परमेश्वरी, जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा 2023 हा 24 एप्रिल रोजी सायंकाळी 6.03 मिनिटांनी कार्ला फाटा येथील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगणात होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी 15 जोड्याची नोंद झाली असून वधू वरांना सोहळा समितीकडून बस्ता वाटप करण्यात आला. यामध्ये वधूला 3 साड्या यामध्ये लग्नाचा शालू, साखरपुड्याची साडी व हळदीची साडी तर वराला लग्नाचा सुट देण्यात आला.

        दरवर्षी अतिशय देखणा व शाही पद्घतीने हा सामुदायिक विवाहसोहळा साजरा केला जातो. सोहळ्याचे यंदा 11 वे वर्ष आहे. मावळ तालुक्यातील शाही सामुदायिक विवाह सोहळा म्हणून कार्ला येथील सोहळ्याकडे पाहिले जाते. किमान 10 हजारांच्या आसपास नागरिक या सोहळ्याला उपस्थिती लावतात. या विवाहसोहळ्यात लग्न करणार्‍या प्रत्येक वधूस दरवर्षी एकतोळा सोन्याचे मंगळसुत्र, पायातील पैंजन, जोडवी, लग्नाची साडी व कन्यादान म्हणून पाच भांडी देण्यात येतात. तसेच साखरपुड्यासाठी वरांस लागणारे ड्रेस, लग्नासाठी सुट व ब्लेझर, मनगठी घड्याळ, इस्त्री, पंखा, वधूराणीस साड्या, नाकातील नथ असे जवळपास प्रत्येक जोडीस दिड ते दोन लाखांचे साहित्य दिले जाते. लग्नाला येणार्‍या वर्‍हाडी मंडळीच्या भोजनाची सोय केली जाते सोबतच नियोजन समितीच्या वतीने नवरदेव मुलांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक ही काढली जाते. 

      मराठा समाजात विवाह सोहळ्यावर वारेमाफ खर्च केला जातो. हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कार्ला परिसरातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेत अकरा वर्षापूर्वी सामुदायिक विवाहसोहळा ही संकल्पना मांडली. तसेच समिती सदस्यांनी त्यांच्या कुटुंबातील मुला मुलींची लग्न या सोहळ्यात करत एक आदर्श घालून दिला. 24 एप्रिल 2023 रोजी होणार्‍या या सोहळ्याला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात वधू वरांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन सोहळा समितीकडून करण्यात आले आहे. बस्ता वाटप सोहळ्याला सोहळा समितीचे संस्थापक भाई भरत मोरे, मिलिंद बोत्रे, सोहळा समिती अध्यक्ष संभाजी येवले, कार्याध्यक्ष सोमनाथ जांभळे, सचिव किरण येवले, सहसचिव संतोष ढाकोळ, खजिनदार संतोष भानुसघरे, माजी अध्यक्ष किरण हुलावळे, सुरेश गायकवाड, बाळसाहेब भानुसघरे, तानाजी पडवळ, नंदकुमार पदमुले, जितेंद्र बोत्रे, रोहिदास हुलावळे, अमोल हुलावळे, गुलाब तिकोणे, जयवंत येवले यांच्यासह सोहळा समितीचे सदस्य उपस्थित होते.

इतर बातम्या