Breaking news

लोणावळ्यातील शिवदुर्ग पथक धावले पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला

लोणावळा : सध्या महाराष्ट्रात विशेषतः कोकण, सांगली आणि कोल्हापूर भागात महापुराने हाहाःकार माजवला आहे. गावच्या गावे महापुराने वेढली आहेत. पुर ओसरायचं नाव घेत नाही. अनेकांची घरे पाण्यात आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या नागरिकांच्या मदतीसाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम धावली आहे. लोणावळा, मावळ व महाराष्ट्रात कोठेही आपत्ती ओढावल्यास शिवदुर्ग रेस्कू पथक कायम मदत कार्यासाठी तत्पर असते. लोणावळा व कार्ला मळवली परिसरात चार दिवसापूर्वी निर्माण झालेल्या पुरस्थितीचा सामना करण्यासाठी 48 ते 72 तास शिवदुर्गचे पथक खांद्याला खांदा लावून काम करत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लोणावळा व ग्रामीण भागातील विस्कळीत झालेले जनजीवन पुर्वपदावर येताच, सामाजिक बांधिलकी जपत सध्या शिवदुर्ग टीम सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खटाव, ब्रह्मनाळ व आजूबाजूच्या गावात मदतकार्यासाठी पोहचली आहे.

    2019 च्या प्रमाणात ‍यावेळी मनुष्य हानी किंवा प्राण्यांची हानी कमी असली तरी गावांमध्ये मध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांचे, अन्न धान्याचे व इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्ण गावे पाण्याने वेढल्याने वैद्यकीय मदत पोहचत नाही. अश्या संपर्क तुटलेल्या गावात सध्या शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमचे गणेश गीध, सुनील गायकवाड, आनंद गावडे, अशोक कुटे, महेश मसने, प्रणय अंबुरे, प्रवीण देशमुख, अजय शेलार, दुर्वेश साठे हे सदस्य काम करत आहेत.


इतर बातम्या