Maval Breaking l कुंडमळा येथे नदीवरील जुना पूल पडला; 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती

लोणावळा : मावळ तालुक्यासाठी 15 जून चा रविवार हा अक्षरशः काळा दिवस ठरला आहे. मावळ तालुक्यामधील पर्यटनाचे आकर्षण स्थळ म्हणून ओळख असलेल्या तळेगाव दाभाडे कुंडमळा येथील रांजण खळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांचा जीव गमावा लागला आहे. या ठिकाणी असलेला इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. त्या पुलावर शंभरहून अधिक पर्यटक होते अनेक पर्यटक पूल पडल्यामुळे नदीपात्रामध्ये पडले आहेत काहीजण वाहून गेले तर काहींना वाचवण्यामध्ये यश आले आहे. सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये दोन मृतदेह मिळून आले असून 38 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे त्यापैकी 18 जणांची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणे कडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्व शासकीय यंत्रणा घटनास्थळी रवाना केली आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील अजितदादा पवार यांनी दिले आहे.
कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवर असलेला लोखंडी पूल हा जीर्ण झाला असून मागील पाच ते सहा वर्षापासून त्या पुलाच्या नूतनी करण्याची मागणी करण्यात येत आहे. मागील वर्षभरापूर्वी या पुलाच्या कामासाठी सहा कोटी रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र सदरच्या कामाला सुरुवात न झाल्याने आज त्याची परिणीती या दुर्घटनेमध्ये झाली आहे. नदीवरील हा पादचारी पूल जीर्ण झाला होता, त्या पुलावरून कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती तरीदेखील काही हौशी पर्यटक या पुलावरून दुचाकी वाहने घेऊन जात असत. पूल जीर्ण झालेला असताना देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावर उभे होते काही जणांची ये – जा सुरू होती. असाच वेळी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक हा लोखंडी पूल नदीपात्रात कोसळला आहे. त्यामुळे पुलावर असलेले पर्यटक हे नदीपात्रात खाली पडले काही पुलाखाली अडकले गेले तर काही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले आहेत. शासकीय यंत्रणे कडून मिळत असलेल्या माहितीनुसार अंदाजे 100 पर्यटक या पुलावर होते. सदर दुर्घटने मधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील 1)पवना रुग्णालय, 2) मायमर हॉस्पिटल, 3) अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान 02 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 03 व्यक्ती अडकले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या दुर्घटनेची माहिती समजताच मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे नेते रवींद्र भेगडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, रघुवीर शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड मुख्यालयाचे आयुक्त व अनेक शासकीय अधिकारी हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले होते. दुर्घटना घडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक व परिसरातील नागरिक देखील दाखल झाले आहे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मदत कार्यास काहीसा अडथळा निर्माण होत होता त्यातच पावसाच्या देखील हलक्या सरी सुरू होत्या या सर्व पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.