Breaking news

Lonavala Murder : किरकोळ कारणावरून सासर्‍याचा खून तर पत्नीवर जीवघेणा हल्ला - आरोपी चार तासात जेरबंद

लोणावळा : किरकोळ कारणावरून सासर्‍याचा खून करत पत्नीवर जीवघेणा हल्ला करणार्‍या आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी चार तासात जेरबंद केले आहे. संतोष नथु वाघमारे (वय-30, सध्या रा. कातकरी वस्ती, आंबेनळी, कुरवंडे, मावळ,  मूळ रा. माणगाव, महाड, रायगड)  असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

    पती आणि पत्नी यांच्यामध्ये मूळ गावी राहण्यासाठी जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतोष याने धारदार कोयत्याने सासरा आणि पत्नीवर वार केले. यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी 5 जून रोजी रात्री उशिरा घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ताब्यात घेत जेरबंद केले आहे. संतोष पांडु वाघमारे (वय-45, रा. कातकरी वस्ती, आंबेनळी, कुरवंडे, मावळ) असे या खूनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या सासर्‍याचे नाव आहे. तर मनिषा संतोष वाघमारे (वय-26, रा कातकरी वस्ती आंबेनळी, कुरवंडे, मावळ) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीची पत्नी मनिषा संतोष वाघमारे हिने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषा वाघमारे हिच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष आणि मनिषा हे पती पत्नी असून, ते लग्नानंतर मनिषाच्या माहेरी लोणावळ्या जवळील कुरवंडे येथील कातकरी वस्तीत राहत होते. संतोष हा मूळचा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी आहे. संतोष हा त्याची पत्नी मनिषाला आपल्या गावाला राहायला चल असे वारंवार सांगत होता. मात्र मनिषा आणि तिचे वडील संतोष वाघमारे यांनी सासरी जाण्यास नकार दिला. यावरून सासरा व जावई यांच्यात वाद झाला. जावई संतोष याने सासरे संतोष यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या मानेवर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सासरा संतोष वाघमारे यांची मान तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी मनिषा हिच्या मानेवर व दोन्ही हातांच्या मनगटावर कोयत्याने वार केल्याने या हल्ल्यात मनिषा गंभीर जखमी झाली आहे. जखमी मनिषा वाघमारे हीच्यावर पनवेल येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

    या घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय प्रभारी पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर,  पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे,  प्रदीप चौधरी, पोलीस कर्मचारी जयराज पाटणकर, विजय मुंडे, हनुमंत शिंदे, राजेंद्र मदने, मनोज मोरे, सागर धनवे, पोलीस मित्र नितेश पडवळ, अमर साबळे यांनी आरोपी संतोष वाघमारे याचा शोध घेत लोणावळा शहर पोलिसांनी काही तासांतच आरोपी संतोषला जंगलातून ताब्यात घेत जेरबंद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश भिसे हे करत आहेत.

इतर बातम्या