Breaking news

Lonavala l तुंगार्ली गावातील जाखमाता मंदिर व हनुमान मंदिरात चोरी; दानपेट्या फोडल्या

लोणावळा : तुंगार्ली गावातील ग्रामदैवत जाखमाता मंदिर व शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. जाखमाता मंदिरातील दानपेटी ही जड असल्याने ती जागेवरच फोडण्यात आली असून हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेऊन शेजारी असलेल्या जाखमाता उद्यानात जाऊन फोडली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटे 02 ते 2.50 च्या सुमारास या चोरीच्या घटना घडल्या आहेत. हनुमान मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. अंगावर रेनकोट घातलेला एक चोरटा यामध्ये दानपेटी उचलून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. 

        लोणावळा शहरांमधील चोरीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. कोणत्या ना कोणत्या भागामध्ये सातत्याने चोऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. सध्या चोरट्यांनी देवस्थानच्या पेट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मागील महिना दीड महिन्यांमधील मंदिरांमधील चोऱ्यांचा हा पाचवा प्रकार आहे. तुंगार्ली ग्रामस्थांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिली असून तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात गेले आहेत. तसेच ग्रामस्थांकडून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरांमधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे पोलीस देखील या घटनेचा तपास करत आहेत. तुंगार्ली गावाच्या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट मागील तीन ते चार दिवसापासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

इतर बातम्या