Breaking news

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची तळेगाव नगर परिषदेमध्ये निर्घृण हत्या

लोणावळा : जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर गंगाराम आवारे यांची आज दुपारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चार अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व कोयत्याने डोक्यात गंभीर वार केले. या हल्ल्यामध्ये गंभिर जखमी झालेले आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.

      जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून किशोर भाऊ आवारे यांनी तळेगाव शहर व मावळ तालुक्यामधील विविध सामाजिक विषयांना हात घालत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती. सोमटणे येथील टोल नाक्याचा विषय त्यांनी मागील काही दिवसांपासून लावून धरला होता. चुकीच्या पद्धतीने हा टोलनाका सोमाटणे गावाच्या हद्दीत उभारण्यात आला असून तो बेकायदेशीर टोलनाका हटवा या मागणीसाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. कोविड काळामध्ये त्यांनी केलेली मदत तसेच एसटी कामगारांचे आंदोलन, अपंग व्यक्तींना निधी मिळवून देण्यासाठी केलेली मदत, रिक्षा चालक अशा समाजातील विविध घटकांसाठी आवारे यांनी काम केले आहे. अशा एका महत्त्वाच्या नेत्याची शासकीय इमारतीमध्ये अशाप्रकारे निर्घृण हत्या होणे हा प्रकार अतिशय दुर्दैवी व संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातून उमटू लागल्या आहे. आज दुपारी दोन वाजता ते तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्याच्या कक्षातून बाहेर पडताच दबा धरुन बसलेल्या मारेकर्‍यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात गोळ्या व कोयत्याने वार झाल्याने आवारे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाले. एक लढवय्या राजकारणी गेल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी सोमाटणे फाटा येथे रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली होती. तर तळेगाव सह संपुर्ण मावळात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इतर बातम्या