Breaking news

Maval News : मावळातील 2 डिसेंबरचे MIDC बंद आंदोलन स्थगित - आमदार सुनिल शेळके

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी 2 डिसेंबर रोजी पुकारलेले MIDC बंद आंदोलन कामगार आयुक्त व एल अँड टी कंपनी व्यवस्थापन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केले आहे. सोमवारपासून काही कामगार व त्यानंतर टप्प्या टप्प्याने उर्वरित कामगार कामावर घेण्याबाबत सकारात्मकता प्रशासनाने दाखवली असल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे मावळचे आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांनी सांगितले.

    मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील एल अँड टी कंपनीतील (L&T) कामगारांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल कामगारांनी मागील 43 दिवसांपासून कंपनी प्रशासना विरोधात ठिय्या आंदोलन पुकारले होते. कामगारांच्या या आंदोलनाची धग सर्वत्र पसरली होती. अशात मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी 2 डिसेंबर (शुक्रवार) रोजी तळेगाव एमआयडीसी (MIDC) बंद करण्याच्या आंदोलनाची हाक दिली होती. आज कामगार आयुक्त आणि L&T कंपनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार शेळके यांनी स्वतः याची माहिती कामगारांना दिली. 'कंपनी प्रशासन आणि कामगार आयुक्त यांनी आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन सोमवारपर्यंत काही कामगारांना कामावर घेण्याचा आणि त्यानंतर उर्वरित काही कामगारांना टप्प्या टप्प्याने कामावर घेण्याचा तसेच कंपनीच्या प्लॅटमध्येच पुन्हा आहे तेथे रुजू करुन घेण्याचा निर्णय घेण्याबद्दल सकारात्मक भुमिका घेतली असून सोमवारपर्यंत कंपनी प्रशासनाने ठोस अहवाल देण्याचे आश्वास दिले आहे. तसेच कामगार आयुक्त यांनीही कामगारांच्या बाबत सकारात्मक भुमिका घेतली असून यांनी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांना सोमवारपर्यंत वेळ देवून उद्याचं आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत. मात्र, सोमवारपर्यंत काही ठोस निर्णय न झाल्यास काय करायचे हे ठरवूयात,' अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी कामगारांशी संवाद साधताना दिली.

इतर बातम्या