Breaking news

Maval Murder Case : मावळ तालुक्यात आज पवनानगर, कामशेत, वडगाव मध्ये निषेध मोर्चे; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

लोणावळा : पवन मावळातील कोथुर्णे गावात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीची हत्या केल्याची घटना काल उघडकीस आली आहे. या घटनेचे मावळ तालुक्यात पडसाद उमटले असून सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी करणार्‍या संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडियातून व्यक्त झाल्या आहेत. संत महात्मांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या मावळच्या भुमीत अशी घटना घडल्याने या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी व आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज पवन मावळातील बाजारपेठ बंद ठेवत सर्वांनी घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी पवनानगर चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे कामशेत शहरात दुपारपर्यत बंद पाळत घटनेचा निषेद नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जनसेवा विकास समितीने वडगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निषेधाने निवेदन देण्यासाठी सर्वांनी वडगाव येथे यावे असे आवाहन केले आहे. मयत मुलगी व आरोपी हे दोघे एकाच गावातील आहे. कामशेत व पुणे ग्रामीण पोलिसांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर अतिशय वेगाने तपासाची चक्रे हालवत 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्याने गुन्हाची कबुली देखील दिली असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मात्र आरोपीकडे अद्याप चौकशी झालेली नाही तसेच मयत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने या घटनेचा स्पष्ट उलगडा व हत्येमागील कारण समोर आलेले नाही. असे असले तरी हा सर्व घटनाक्रम संताप आणणारा असल्याने समाजातील सर्व स्तरातून घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासन व न्याय व्यवस्था यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी समाज करत असून याचाच एक भाग म्हणून आज मावळ तालुक्यात जागोजागी बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

इतर बातम्या