वडगाव जवळ गॅरेज मध्ये सुरू होता मटका; पोलिसांची धाड ! 7 जण ताब्यात - 71 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वडगाव फाटा येथील हॉटेल ज्योतिर्लिंग शेजारील उंबराळी ऑटो गॅरेज मध्ये धाड टाकत त्याठिकाणी मटका खेळविणारी व्यक्ती व अन्य सहा जण अशा एकूण 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 71 हजार 305 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटक्यावर लोणावळा उपविभाग व वडगाव पोलीस पथकाने धाड टाकली. त्यावेळी त्याठिकाणी एक व्यक्ती पावती पुस्तक हातात घेवून बसली असल्याचे दिसले. त्याला ताब्यात घेत पोलीसांनी चौकशी केली असता त्याने रविंद्र मोरेश्वर हवालदार असे नाव सांगितले. त्यांच्या समोर इतर 6 इसम मटका खेळत असताना मिळून आल्याने त्या सर्वाना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 71305/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक कदम, सपोनि सचिन राऊळ, पोसई चव्हाण, पोसई भोसले, पोहवा/बनसोडे, पोहवा/कवडे, व वडगाव पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांनी केली.