Lonavala News l लोणावळा शहराचे अंतरंग उलगडणाऱ्या अंतर्नाद लोणावळा या पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन
लोणावळा : लोणावळा शहराचे अंतरंग उलगडणाऱ्या अंतर्नाद लोणावळा या पुस्तकाचे प्रकाशन वसंत पंचमीच्या दिवशी अगदी दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. लोणावळ्यातील कवयित्री व लेखिका सिंधू जाधव यांनी हे पुस्तक संपादित केले असून त्यांच्या सिंधू आर्ट प्रकाशन येथून ते प्रकाशित करण्यात आले आहे.
लोणावळा शहरातील विविध जुन्या गोष्टींना या पुस्तकामधून उजाळा देण्यात आला आहे. विविध विषयांवर लोणावळा व परिसरातील लेखकांनी यामध्ये आपले लेख लिहिले आहेत. लोणावळा शहराचे अंतरंग समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. लेखकांनी देखील त्याच दृष्टिकोनातून यामध्ये नानाविध लेख लिहिले आहेत व संपादकांनी अतिशय उत्तमरीत्या ते संपादित करून वाचकांसाठी शब्दबद्ध केले आहेत. अंतर्नाद लोणावळा हा पहिलाच अंक प्रकाशित करण्यात आला आहे. दरवर्षी लोणावळा व मावळ भागाचे विविध पैलू उलगडणारे अंक प्रकाशित केले जाणार असल्याचे या प्रकाशन सोहळ्या दरम्यान संपादिका सिंधू जाधव यांनी सांगितले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी जेष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका नाईक, लोणावळ्यातील वस्तू विशारद व इतिहास अभ्यासक आनंद नाईक, अखिल भारतीय नवोदित साहित्य परिषद पुणे च्या उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा संगीता लंघे, लेखिका सिंधू जाधव यांच्यासह प्रकाश रणधीर, नवनाथ लेंडघर, रमेश बोंद्रे, सुनील यादव, संजय आडसुळे, गिरीश पारेख, नितीन कल्याण, विजया कल्याण, उमा मेहता, आरोही तळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ लेंडघर यांनी केले तर अनुप्रित यादव यांनी सूत्रसंचालन केले.