Breaking news

लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी; पर्यटक वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या तीन तासात आवळल्या मुसक्या

लोणावळा : लोणावळा परीसरात जुन्या पुणे मुंबई हायवे रोडवरील तसेच मळवली, कार्ला भाजे परीसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. शनिवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परिसरामध्ये पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅगांमधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु इत्यादी कोणीतरी अज्ञात चोरटा चोरून नेल्या असल्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दोन तक्रारदारी दाखल झाल्या होत्या. सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार नितेश कवडे व पोलीस नाईक गणेश होळकर यांच्या पथकाने घटनेच्या अनुषंगाने आरोपीचा व गाडीचा शोध घेण्यासाठी प्रथम मनशक्ती केंद्र वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता सदर फुटेजमध्ये इनोव्हा सदृष्य कारमधील 30 ते 35 वयाचा व अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळल्याने पोलीसांनी आढळला. 

      सदर संशयीत इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नं. GJ 06 FC 3806 ही मौजे भाजे धबधबा नं. 2 परीसरात संशयीत रित्या फिरत असताना मिळून आली. पोलीसांनी कार चालकाकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अखिल सलीम व्होरा (वय 32 वर्षे रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात) असे सांगितले. पोलीसांनी सदर कारची झडती घेतली असता नमुद कार चालकाकडे इनोव्हा गाडीमध्ये सिमकार्ड नसलेले एकूण 6 मोबाईल, तसेच 5 पर्स, 2 बॅगा, 2 पॉवर बँक, 2 घड्याळे, 22,900/- रोख रक्कम व इनोव्हा कार असा एकुण 12,11,100/- रुपये असा माल मिळून आला. त्याबाबत पोलीसांनी अधीक चौकशी केली असता सदर माल व रोख रक्कम ही काही गाड्यांच्या काचा फोडून चोरी केली असल्याची कबूली त्याने दिली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. आरोपी कडून दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपी जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनला त्यांचेकडील गुन्ह्यात पाहीजे असल्यास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

     लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व्यतिरिक्त यापूर्वी लोणावळा शहर, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत देखील अशा प्रकारचे गुन्हे घडलेले असून अशा गुन्ह्यांचा कसोशीने तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सहायक पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तिक यांनी सर्व पोलीस पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सदरचे दोन गुन्हे घडताच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी तत्परता दाखवून यातील गुन्हेगारास शिताफीने अटक करुन दोन्ही गुन्हे तात्काळ उघडकीस आणले आहेत.

      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक व वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजय मुंढे यांच्या पथकाने केली असून गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या