Breaking news

आरोपींच्या ‘मेडिकल’ साठी लोणावळा पोलिसांना करावी लागतेय वणवण

लोणावळा :  येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींच्या मेडिकल चेकअपसाठी लोणावळा शहर तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांना चांगलीच वणवण करावी लागते आहे.  मावळ तालुक्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रावर या कामासाठी डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची तक्रार खुद्द पोलीसच करू लागले आहेत.

    लोणावळा शहरात खंडाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मात्र याठिकाणी केवळ एकाच डॉक्टर उपलब्ध आहे. या एकाच डॉक्टरवर नेहमीच्या रुग्ण तपासणी बरोबरच शव विच्छेदन आणि सध्या सुरू असलेल्या कोविड लसीकरणचा ताण येत आहे. त्यामुळे अनेकदा येथील डॉक्टर कडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार पोलिसांकडून करण्यात येते. याशिवाय कार्ला आरोग्य केंद्र, खटकाळा आरोग्य केंद्र, कान्हा फाटा आरोग्य केंद्र, तळेगाव आरोग्य केंद्र येथे कोठेही आरोपींच्या मेडिकल साठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे आरोपींना सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या पिंपरी येथे वायसीएम हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

   मात्र नुकतेच वायसीएम हॉस्पिटलमध्ये देखील असे आरोपी वैद्यकीय तपासणी साठी घेऊन न येण्याची सूचना करण्यात आल्याने सदर आरोपींना औंध या ठिकाणी किंवा थेट पुण्यात ससून रुग्णालयात घेऊन जावे लागत असल्याने पोलीस हवालदिल झाले आहे. न्यायालयात केवळ सरकारी रुग्णालयात केलेली मेडिकल ग्राह्य धरली जात असल्याने खाजगी रुग्णालयात आरोपींना घेऊन जाणे पोलिसांना शक्य होत नाही. या सर्वामध्ये आरोपींसोबत पोलिसांची देखील जी ससेहोलपट सुरू आहे ती थांबण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना आरोपींच्या मेडिकल करण्यासंदर्भात लिखित सूचना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

इतर बातम्या