Lonavala Rain Information l लोणावळ्यात सोमवारी 26 मे रोजी 68 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात सोमवारी 26 मे रोजी 68 मिमी (2.68 इंच) पावसाची नोंद झाली आहे. रविवारी लोणावळा शहरांमध्ये थैमान घातल्यानंतर सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामध्ये मान्सून देखील सक्रिय झाल्याने लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
यावर्षी अनेक वर्षांनंतर मे महिन्यातच मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनच्या आगमनाच्या किमान पंधरा दिवसा अगोदर पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे नागरिकांचे तारांबळ उडाली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. धूळ वाफेवर जी भात रोपांची पेरणी केली जाते ती कुठेही न झाल्याने यावर्षी भात पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच जनावरांसाठी लागणारा चारा व पावसाळ्यात लागणाऱ्या सरपणाची देखील साठवणूक योग्य प्रकारे अद्याप झालेली नसल्याने सर्व साहित्यांची भिजून नुकसान झाले आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी आजपर्यंत 478 मिमी (18.82 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत लोणावळा शहरात केवळ 54 मिमी (2.13 इंच) पाऊस झाला होता.
रविवारी झालेल्या अचानक पावसामुळे लोणावळा शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. भांगरवाडी येथील निशिगंधा सोसायटी, तुंगार्ली येथील बद्री विशाल सोसायटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीच असले होते. गवळीवाडा परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी बसले. जुना खंडाळा येथे देखील काही घरांना पाणी घुसल्याने त्रास सहन करावा लागला. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही समस्या उदभवली होती. प्रशासनाने ज्या ठिकाणी सफाई योग्य प्रकारे झालेली नाही त्या ठिकाणची नालीसफाई करून घ्यावी व ज्या भागांमध्ये नैसर्गिक नाले अडवले गेले आहेत अशा ठिकाणी कारवाई करत नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत मोकळे करावेत अशी मागणी भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले आदींनी केली आहे.