Breaking news

Lonavala News : बेकायदेशीर दारु विकणार्‍यांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई; 1 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : लोणावळा शहरात मागील दोन दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत दारुसह 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भरत लक्ष्मण कदम व गणेश पांडुरंग साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत शनिवार दिनांक 13 मे रोजी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास संजीवनी हॉस्पिटल रोडवर यातील आरोपी भरत लक्ष्मण कदम (वय 36 वर्ष, रा.बारपे ता. मुळशी, जि पुणे) हा त्याच्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार (क्र.एम.एच. 05 बी. एल. 9099) मधून बेकायदा विक्रीसाठी 24 बियरच्या बाटल्या, देशी संत्रा दारूच्या 48 बाटल्या, मॅकडॉल्स दारुच्या 10 बाटल्या घेऊन चालला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत रविवारी दिनांक 14 मे रोजी दुपारी 12.55 वाजण्याच्या सुमारास गणेश पांडुरंग साळवे (वय 35 वर्ष, रा. कुसगाव, ता मावळ, जि पुणे) हा आपल्या काळ्या रंगाची अँक्टीव्हा मोटार सायकल (क्र. एम.एच. 14 जे डब्लु 5546) वरून इंपेरियम ब्लु नावाचे 10 बॉटल, डब क्वमससे नावाचे 11 बाटल्या, देशी संत्रा दारूच्या 47 बाटल्या, टॅगो पंच दारूच्या 21 बाटल्या बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या सापळ्यात सापडला. 

     लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस नाईक हनुमंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मदने, मनोज मोरे यांनी या दोन्ही कारवाया केल्या. आरोपींच्या विरोधात मु. प्रो. अँक्ट कलम 65 (ई) (अ) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

इतर बातम्या