मोठी बातमी l कामशेत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 56 लाख 92 हजार रुपये किमतीचा गांजा पकडला

लोणावळा : संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत कामशेत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 98 किलो वजनाचा, 56 लाख 92 हजार रुपये किमतीचा गांजा पकडला आहे. 22 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले आहे.
कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना 22 ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, ताजे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गाने मळवली ते लोणावळा दरम्यान एका कारमधून गांजाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे रवींद्र पाटील यांनी दोन पथके तयार करत सदर मार्गावर सापळा रचला असता एका वेरना या चार चाकी गाडी मधून चार इसम तब्बल 98 किलो गांजा सह मिळून आले आहेत.
अभिषेक अनिल नागवडे (वय 24), प्रदिप नारायण नामदास (वय 25), योगेश रमेशलगड ( वय 32) वैभव संजीवण्न चेडे (वय 23, सर्व रा. पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांवता. शिरूर जि.पुणे) यांना गांजा सह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशन मध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क) 20 (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदार रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांच्या पथकाने केली आहे.
1 वर्षात 71 केसेस 1 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल जप्त
लोणावळा उपविभागाच्या हद्दीत मागील एक वर्षात संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत एनडीपीएस ॲक्ट प्रमाणे 71 केसेस करत तब्बल 1 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून 102 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली. लोणावळा शहर व परिसरामध्ये कोठेही गांजा ड्रग्स एमडी पावडर यासारख्या अमली पदार्थांची विक्री होत असेल अथवा कोणी नशा करत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला द्यावी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे श्री सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.