Breaking news

गुरुकुलमध्ये एआय व रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन

लोणावळा : विद्या विनय सभा, गुरुकुल संस्थेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या एआय व रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या शुभहस्ते उत्साहात झाले.

      कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक ग. ल. चंदावरकर (दादा) व वसुंधरा चंदावरकर (बाई) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिनेश राणावत यांनी केले. गुरुकुल संस्था ही नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दीपक गंगोळी यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा व कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. संस्थेचे सचिव सुरेश पंसारी यांनी गुरुकुल संस्था भविष्यातही गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.

      उद्घाटनानंतर डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर, चिकाटी आणि परिश्रम या गुणांना महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच जीवन जगण्याची कला आत्मसात करणे आवश्यक असून भविष्यात परकीय भाषांचे ज्ञानही उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः जपानी भाषा आत्मसात करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

      एआय आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रभावी वापर करण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष प्रयोग, तंत्रज्ञानाचा वापर आणि नवकल्पनांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला नियामक मंडळाचे सदस्य बालकिशन आगरवाल व अनुज गंगोळी यांच्यासह तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापिका अनुष्का कालगुडे, रेवती कांबळे तसेच मुख्याध्यापक बयाजीराव खुरंगे, माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे, पालक प्रतिनिधी, ओमोटेक संस्थेचे प्रतिनिधी, तिन्ही विभागांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       यावेळी दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांनी एआय प्रशिक्षणादरम्यान आलेले आपले अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आणि आत्मविश्वास दिसून आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूलाल तारे यांनी केले, तर आभार बयाजीराव खुरंगे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

इतर बातम्या

15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी