Missing Link Accident l मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात भीषण अपघात; वाकडच्या तरुणाचा जागीच मृत्यू, ५ जखमी!
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'च्या बोगद्यामध्ये शुक्रवारी (७ ऑगस्ट) पहाटे १:२० वाजताच्या सुमारास फॉर्च्युनर कार आणि आयशर टेम्पोचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. अतिवेगात असणारी फॉर्च्युनर कार समोर चाललेल्या टेम्पोला मागून जोरात धडकल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील तुषार वामन भूमकर (रा. वाकड) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार बोगद्यातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात कारचा चक्काचूर, एअरबॅग्ज न उघडल्याने प्राण गमावला
मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनर कार मुंबईकडून पुण्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होती. मिसिंग लिंकच्या बोगद्यात प्रवेश केल्यानंतर ही कार समोर जाणाऱ्या आयशर टेम्पोवर मागून जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला, तर फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. दुर्दैवाने, अपघाताच्या वेळी फॉर्च्युनर कारच्या एअरबॅग्ज (Airbags) उघडल्या नाहीत. त्यामुळे डोक्याला व शरीराला गंभीर मार लागल्याने वाकड येथील तुषार भूमकर या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात कारमधील प्रसाद नानासाहेब विनोदे, पंकज पाटील, प्रदीप भुसारे, अमित तालाराम भाटी, टेम्पो चालक रामभाऊ मुडबे (रा. धाराशिव) आणि क्लिनर कुलदीप बाबुराव पवार (वय ३१, रा. औसा, लातूर) हे जखमी झाले आहेत.
बोगद्यात विरुद्ध दिशेने वाहने उभी? सुरक्षेवर गंभीर प्रश्न
मिसिंग लिंक मार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित केलेली असतानाही, ही कार मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, अपघाताच्या वेळी बोगद्यामध्ये विरुद्ध दिशेला तोंड करून दोन वाहने उभी होती, ज्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी एक लेन बंद झाली होती. उर्वरित दोन लेनवरून वाहतूक सुरू असतानाच हा अपघात घडला.
सोशल मीडियावर तीव्र संताप आणि प्रशासनावर टीका
करोडो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील सुरक्षेच्या त्रुटींवरून आता सोशल मीडियावर नागरिकांमधून जोरदार टीका होत आहे. नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावनांनुसार, शासनाने एवढा मोठा प्रकल्प उभारला आहे तर तिथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना आणि कडक सुरक्षा यंत्रणा तात्काळ तैनात करणे अत्यंत गरजेचे आहे. या अपघातानंतर परिसरातून मोठी हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.



















