Breaking news

लोणावळ्यातील नागरी समस्यांचा सोशल मीडियावर पडतोय पाऊस; लोणावळा नगरपरिषदेचे समस्या सोडवण्याकडे होतंय दुर्लक्ष

लोणावळा : लोणावळा शहरातील नागरी समस्यांचा सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडत आहे. प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे शहरातील नागरी समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. एसआयआर च्या कामाचे कारण देत केवळ प्रशासनाकडून वेळ काढून सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.

लोणावळा शहरामध्ये यावर्षी जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वेगवेगळ्या भागातील खड्ड्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ पडल्यानंतर त्याची दखल घेत प्रशासन कारवाई करत आहे मात्र नागरिकांकडून समस्यांचा पाऊस सोशल मीडियावर पडण्याची वाट प्रशासन व लोकप्रतिनिधी का पहात आहेत असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ज्या रस्त्यावरून नागरिक रोज प्रवास करतात त्याच रस्त्यावरून प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचा देखील दैनंदिन वावर असतो, असे असताना त्यांना रस्त्यावरील एक खड्डे साचलेले पाणी दिसत नाही का?

नागरिकांनी फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची वाट प्रशासन का पाहत आहे. वेगवेगळ्या भागातील रस्त्यांच्या स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्याबाबत दररोज सोशल मीडियावर तक्रारींवर तक्रारी सुरू आहे. कचरा उचलला जात नाही याबाबतच्या तक्रारी आहेत, नदी नाले सफाईबाबत तर सर्वत्र बोंब झाली असून त्याबाबत वारंवार नागरिक तक्रारी करत आहे. असा एक दोन नव्हे तर अनेक तक्रारी वारंवार सोशल मीडियावर पाहायला व ऐकायला मिळत असताना देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी देखील आपापल्या भागामधील समस्या सोडवण्यात कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. तक्रारी केल्यानंतर त्याची सोडवणूक होणार असेल तर मग कोट्यवधी रुपयांचे टेंडर देण्याचा फायदा काय. लाखो रुपये पगार घेणारे शासकीय अधिकारी शहरातील समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर का फिरत नाही. बीट अधिकारी, मुकादम यांच्याकडून वरिष्ठांना समस्यांबाबतचे अहवाल सादर होत नाहीत काय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

इतर बातम्या