Breaking news

Sunil Shelke l लोणावळा शहरामध्ये महायुती आमदार सुनील शेळके यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये महायुतीचे पदाधिकारी प्रचार यंत्रणा राबवत आमदार सुनील शेळके यांना मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या अध्यक्षांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीने आमदार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर लोणावळा शहरातील महायुती मधील सर्व घटक पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत पुढील पंधरा दिवस आमदार सुनील शेळके यांनी केलेली विकास कामे ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवत त्यांना लोणावळा शहरामधून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे जाहीर केले. येत्या 9 नोव्हेंबर रोजी लोणावळा शहरांमध्ये प्रचाराचा नारळ वाढवत आमदार सुनील शेळके यांचे निवडणूक प्रचार पत्रक व कार्य अहवाल हा जनतेपर्यंत पोहोचवत घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     यावेळी माजी आमदार रुपलेखाताई ढोरे, भारतीय जनता पार्टीचे लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कमलशील म्हस्के, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष बाबा ओव्हाळ, लोक जनशक्ती पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष अशोक गिरणे यासह माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गायकवाड, माजी नगरसेवक जीवन गायकवाड, माजी नगरसेवक संजय घोणे, मनोज ढोरे, लोणावळा शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष उमा मेहता, माजी उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर, माजी नगरसेविका अंजना कडू, राष्ट्रवादीचे नेते जाकीर खलिफा यांच्यासह वरील सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी बोलताना सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांनी लोणावळा शहरांमधून महायुतीच्या माध्यमातून आमदार सुनील शेळके यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. मागील पाच वर्षांमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे ही सर्वश्रुत आहे. लोणावळा शहरांमधील मागील अनेक वर्षापासून ची सरकारी रुग्णालयाची मागणी ही आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. मागील निवडणुकीमध्ये त्यांनी लोणावळ्यातील नागरिकांना निवडून आल्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचा शब्द दिला होता. आज लोणावळा शहरामध्ये सुसज्ज असे शासनाचे उपजिल्हा रुग्णालय उभे राहिले आहे. मागील सात वर्षांपासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचा विषय हा देखील आमदार सुनील शेळके यांनी मार्गी लावत त्याकरिता तीन कोटी रुपयांचा निधी एक महिन्याच्या आत उपलब्ध करून दिला आहे. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतींची कामे ही देखील पूर्णत्वास येत आहेत. लोणावळा मंडल कार्यालय इमारत देखील मंजूर झाली आहे. लोणावळा शहरांमधील नांगरगाव, अंबरवाडी मंदिराकडे जाणारा रस्ता यावरील पुलांची कामे करण्यात आली आहे. आयटीआय येथील इमारतीचे दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम झाले आहे. विविध भागांमधील रस्ते व स्ट्रीट लाईट तसेच लोणावळा, खंडाळा, नांगरगाव, वलवन या भागातील तलाठी कार्यालय इमारती, रस्ते, समाज मंदिरे असा सुमारे 137 कोटी रुपयांचा निधी लोणावळा शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार सुनील शेळके यांनी उपलब्ध करून दिला आहे. 

      लोणावळाकरांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असलेला आरोग्याचा प्रश्न व इतर कामांसाठी दिलेला भरघोस निधी या सर्व गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवत, आमदार सुनील शेळके यांना लोणावळा शहरांमधून मोठी मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुती सज्ज झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार सुनील शेळके यांनी केवळ कामाची आश्वासने दिली नाहीत तर ती कामे पाठपुरावा करून मार्गी लावली आहेत. अशा या विकास पुरुषाच्या मागे प्रत्येक मतदाराने उभे राहणे हे कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. केवळ लोणावळा शहरातील विकासच नाही तर येथील कष्टकरी जनता येतील हातावर पोट असलेले रिक्षा चालक, टॅक्सी चालक, टपरी चालक या सर्वांना संरक्षण व न्याय देण्याची भूमिका आमदार सुनील शेळके यांनी बजावली आहे. लोणावळा शहरालगत असलेल्या लायन्स पॉईंट या ठिकाणी जागतिक कीर्तीचा ग्लास स्काय वॉक हा पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करून त्याला साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी देखील त्यांनी मंजूर केला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन देखील झाले आहे. अशा या कणखर नेतृत्वाच्या मागे लोणावळा शहर पूर्ण ताकदीने उभे राहील असा आशावाद या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या