Breaking news

Lonavala Traffic News : काय ट्रॅफिक.. काय गाड्या… काय गर्दी… पण दुकानं पडल्यात ओस

लोणावळा : लोणावळ्यात पावसाळा सुरु झाला की प्रत्येक शनिवार व रविवार तसेच सलग सुट्टयांचे दिवस म्हणजे तुफान वाहतूककोंडी हे एक समीकरण बनले आहे. मागील अनेक वर्षापासून हा मुद्दा उपस्थित होतो आहे मात्र त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. पावसाळी पर्यटनाचे आवडते व जवळचे ठिकाण म्हणून मुंबई, पुणे, रायगड, पिंपरी चिंचवड भागातील नागरिक व पर्यटक लोणावळा शहराला पसंती देतात. दिवसेंदिवस पर्यटकांची व वाहनांची संख्या वाढत असल्याने शहरात प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. आज शनिवारी शहरातील रस्ते व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड कोंडी झाली आहे. पाच ते दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. शहरात वाहनांची गर्दी वाढली असली तरी दुकाने मात्र ओस पडली होती. वाहनांच्या रांगा असल्याने कोणालाही वाहने थांबवत दुकानात जाता येत नव्हते. यामुळेच आजची परिस्थिती पाहून काय ट्रॅफिक.. काय गाड्या… काय गर्दी… पण दुकानं पडल्यास ओस असं म्हणायची वेळ नागरिकांवर आली होती. लोणावळा शहरात पर्यटक येतात इटस ओके पण वाहतूककोंडीने हैराण होतात इटस नाॅट ओके. म्हणूनच या कोंडीवर उपाय काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. रखडलेली पुलांची कामे, जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले रुंदीकरण, अवजड वाहनांच्या शहरातील प्रवेश बंदीची अंमलबजावणी ही कामे होणे गरजेचे आहे. सोबतच मुख्य रस्त्यांवरील कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिकांना सुट्टीच्या दिवशी व शनिवार - रविवारी घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. पावसाळा सुरु झाला. दर आठवड्याला शहरात भरमसाठ कोंडी होत असताना देखील लोणावळा शहराला वाढीव पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही. प्रशासकीय पातळीवर पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांनी कोणतीही आढावा बैठक घेत काय उपाययोजना कराव्यात याबाबत नागरिकांशी व नेते मंडळींशी संवाद साधलेला नाही. 

इतर बातम्या