सोनाली मनोज जगताप यांच्या माध्यमातून वाकसई ग्रामपंचायतीमधील 2000 नागरिकांना मोफत कोल्हापूर महालक्ष्मी व ज्योतीबा दर्शन

लोणावळा : वाकसई ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सोनाली मनोज जगताप यांच्या वतीने वाकसई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी मोफत कोल्हापूर महालक्ष्मी व ज्योतिबा दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन हजार नागरिकांनी या दर्शन यात्रेचा लाभ घेतला. बुधवारी सकाळी वाकसई गावांमधून 33 मोठ्या बसेस व इतर वाहनांमधून हे सर्व नागरिक देवदर्शनासाठी गेले होते. श्रावण मासा मध्ये नागरिकांना देवदर्शन झाल्याने सर्वांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
सोनाली मनोज जगताप व बाळासाहेब भरत येवले यांच्या कार्यकालामध्ये वाकसई ग्रुप ग्रामपंचायत ही स्मार्ट व्हिलेज बनली होती. यावर्षी पुन्हा एकदा सोनाली मनोज जगताप या जनतेमधून सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार असून त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच मनोज जगताप हे मागील पंधरा वर्षापासून करत असलेल्या सामाजिक व राजकीय कार्याच्या बळावर पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याविषयी बोलताना सोनाली जगताप म्हणाल्या, मागील काही दिवसांपासून नागरिकांची विशेषतः महिलांची कोल्हापूर दर्शन यात्रा आयोजित करा अशी मागणी होती. याकरिता सदर महालक्ष्मी व ज्योतिबा दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही ठिकाणी दर्शन झाल्यानंतर सर्व नागरिकांच्या चेहर्यावरील आनंद पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी खास महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला देखील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला होता. ग्रामस्थांचे व महिलांचे आमच्यावर असलेले प्रेम यावरून उघड होत आहे. यापुढील काळात देखील केवळ देवदर्शन किंवा करमणुकीचे कार्यक्रम नव्हे तर वाकसई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चारही गावे व वाकसई चाळ येथील नागरी समस्या सोडवत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल असे सांगितले.