Breaking news

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड; पत्राचाळ प्रकरण - अटकेची शक्यता

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी रविवारी सकाळी सात वाजताच ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील बंगल्यावर छापेमारी केली. यावेळी घरी संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि बंधू सुनील राऊत होते. या तिघांचीही सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी चौकशी  करत आहेत. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीदेखील सहभागी होती. मात्र, त्यानंतर कंपनी त्या व्यवहारातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. सध्या ईडीच्या अटकेत असलेल्या प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे त्यांनी आपले कुटुंबीय आणि नीकटवर्तीयांच्या खात्यात वळविले होते. यातील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही नावे वळविण्यात आल्याचे प्रवीण राऊत यांच्या चौकशी दरम्यान बोलले गेले. तसेच, याच पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावे दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे 8 भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ईडीने राऊत यांच्यावर ठेवला असून त्या अनुषंगाने ईडीने त्यांची यापूर्वी चौकशी केली होती आणि वर्षा राऊत यांच्या नावे असलेला दादर येथील फ्लॅट तसेच किहीममधील 8 भूखंड अशी 11 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केलेली आहे. या प्रकरणी राऊत यांना पुन्हा जुलै महिन्यात दोन वेळा चौकशीसाठी ईडीने समन्स जारी केले होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आता रविवारी ईडीने ही छापेमारी केली आहे. राऊत यांच्या अटकेची आता शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले आणि मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही, असे ट्विट करत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इतर बातम्या