मोठी बातमी l लोणावळ्यात एमडी ड्रग्जीची मोठी कारवाई; वलवण येथील नीता इन हॉटेल परिसरात २.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोणावळा : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लोणावळा परिसरात कारवाई करत एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबईतील ३३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. शाहरुख आतिख शेख (वय ३३, रा. रॉयल हाऊसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २४.१९ ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल फोन आणि अन्य मुद्देमालासह एकूण २ लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.२० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी लोणावळा शहरातील वलवण गावात नीता इन हॉटेलजवळ, मगनलाल चिक्कीच्या दुकानाशेजारी शाहरुख शेख हा बजाज सीटी १०० दुचाकीवर (क्रमांक MH03DY7271) थांबलेला आढळला. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत एमडी पावडर आढळून आली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियमाच्या (NDPS Act) कलम ८(क) व २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला अंमली पदार्थ कुठून आणला आणि त्याचा पुरवठा कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि मावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, पोलीस हवालदार संतोष शेळके, सागर नामदास, गणेश होळकर, गणेश धनवे, सिद्धेश्वर पाटील, तुषार भोईटे तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे, पोलीस हवालदार सतीश घोंगडे, संदीप मानकर आणि पोलीस शिपाई श्रीराम बोराडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
















